भंडारा : महिलेवर सामूहिक अत्‍याचार; संशयितांच्या दोन दुचाकी जप्त | पुढारी

भंडारा : महिलेवर सामूहिक अत्‍याचार; संशयितांच्या दोन दुचाकी जप्त

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा : जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाळमोह परिसरातील महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या दोन दुचाकी गोंदिया पोलिसांनी जप्त केल्या. या घटनेच्या तपासासाठी गोंदिया पोलिसांचे पथक काल जिल्ह्यात आले होते.

२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह येथे शेतशिवारात पीडित महिला विवस्‍त्र अवस्थेत आढळली होती. कारधा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. चौकशीअंती महिलेवर गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि पळसगाव मार्गावरील एकाने आणि भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह परिसरातील दोघांनी अत्याचार केल्याचे पुढे आले.

सदर प्रकरण गंभीरतेने घेत कारधा पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला. कारधा पोलिस ठाणे, लाखनी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध चमू बनवून आरोपींचा शोध घेतला. अखेरीस या प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील पहिली अत्याचाराची घटना गोंदिया जिल्ह्यातील हद्दीत घडल्याने कारधा पोलिसांनी गुन्हा नोंदवून सदर प्रकरण गोंदिया जिल्हा पोलिसांकडे वर्ग केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी गोंदिया पोलिसांचे पथक कन्हाळमोह परिसरात दाखल झाले. दोन आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी गोंदिया पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :  

Back to top button