Nagpur : स्वतःला कारमध्ये पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या: पत्नी आणि मुलालाही संपविण्याचा प्रयत्न | पुढारी

Nagpur : स्वतःला कारमध्ये पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या: पत्नी आणि मुलालाही संपविण्याचा प्रयत्न

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पत्नी आणि मुलाला कारमध्ये बसवून, कार पेटवून सामूहिक आत्महत्या करताना नागपुरातील एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला. तर या दुर्दैवी घटनेतून पत्नी आणि मुलगा मात्र बचावले आहेत. नागपुरातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत ही घटना उघडकीस आली आहे. आर्थिक अडचणीतून कमालीच्या नैराश्यात गेलेल्या इसमाने स्वत:ला पेटवून घेतले आणि पत्नी व मुलाला कारमध्ये जाळले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला; तर पत्नी आणि मुलगा हे गंभीररित्या होरपळले आहेत. वर्धा मार्गावरील खापरी पुनर्वसन परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

रामराज गोपालकृष्ण भट (वय ६३), असे मृताचे तर त्यांच्या पत्नी संगीता (५७) व मुलगा नंदन (३०), असे मायलेकाचे नाव आहे. दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रामराज यांची एमआयडीसी भागात कंपनी असून, अनेक दिवसांपासून ती बंद आहे. संगीता या गृहिणी, तर नंदन हा अभियंता आहे. तो शेअर ट्रेडिंग करतो. तीन वर्षांपासून रामराज यांना आर्थिक चणचण आहे. त्या तणावातून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमध्ये जेवायला जाऊ, असे सांगून त्यांनी पत्नी व मुलाला बाहेर नेले. त्याच वेळी त्यांनी एका बाटलीत पेट्रोल आणि एका बाटलीत विष घेतले. पचनासाठी औषध घेऊन घेऊ, असे सांगत त्यांनी स्वत: विष घेतले. नंदन व संगीता यांनाही प्यायला सांगितले. संगीता यांनी ते पिले, तर नंदनने नकार दिला. काही कळायच्या आत रामराज यांनी बाटलीतील पेट्रोल स्वत:च्या आणि या दोघांच्या अंगावर टाकले. आग लावली. भडका उडाला. कारने पेट घेतला. संगीता व नंदन यांनी कसाबसा दरवाजा उघडला व ते बाहेर पडले. काही नागरिकांनी त्यांना मदत केली. तर, रामराज यांचा कारमध्ये आगीत होरपळून मृत्यू झाला.

रामराज यांनी आत्महत्येपूर्वी आर्थिक चणचणीतून कुटुंबासह आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली. स्वत:ला आग लावण्यापूर्वी त्यांनी ही चिठ्ठी कारमधून बाहेर फेकली. बेलतरोडी पोलिसांना ती आढळली. सविस्तर चिठ्ठी माझ्या घरातील कपाटात आहे, असे या चिठ्ठीत नमूद आहे. पोलिसांनी भट यांच्या घरातील कपाटातून दुसरी चिठ्ठीही जप्त केली. यातही आर्थिक चणचणीतून आत्महत्या करीत असल्याचे इंग्रजीत लिहिले आहे.

Back to top button