यवतमाळमध्‍ये सूर्य कोपला; तापमान ४५.२ अंशावर, एप्रिल महिन्यातील आजवरचे सर्वोच्च तापमान | पुढारी

यवतमाळमध्‍ये सूर्य कोपला; तापमान ४५.२ अंशावर, एप्रिल महिन्यातील आजवरचे सर्वोच्च तापमान

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या झळांमुळे जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी तर तापमानाचा कहरच झाला. तब्बल ४५.२ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. एप्रिल महिन्यातील आजवरचे हे सर्वोच्च तापमान असल्याचे हवामान विभागातील तज्ज्ञांनी सांगितले. उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी दुपारी रस्त्यावर शुकशुकाट होता.

यंदाचा एप्रिल महिना भलताच तापला आहे. पारा दिवसेंदिवस नव्या उंचीवर जात आहे. शुक्रवारी तापमानाने एप्रिल महिन्यातील आजवरचे विक्रमी तापमान मोडीत काढले. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झाले आहेत.  तोंडाचा मास्क गेला आणि दुपट्टा आला अशी काहीशी अवस्था या उन्हामुळे झाली आहे.

मागील आठ दिवसातील तापमानाची आकडेवारी बघितली असता, दिवसेंदिवस उन्हाळा अधिकाधिक कठीण होत चालल्याचे चित्र आहे. २२ एप्रिल रोजी ३९.६ अंशावर असलेले तापमान अवघ्या आठ दिवसात ४५.२ अंशावर जाऊन ठेपले आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून, अनेकजण सकाळी ११ नंतर घराबाहेर निघणे ही टाळत आहेत.

Back to top button