

अकोला ; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी क्रिडा प्रशिक्षकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. याप्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या अकोला विशेष न्यायालयाने आज १७ मार्च रोजी हा निकाल दिला.
आरोपी हा क्रिडा शिक्षक असून तो अल्पवयीन क्रीडा प्रशिक्षणार्थी मुलींसोबत शरीर संबंध ठेवत होता. तसे करू न दिल्यास टीममधून काढून टाकण्याची धमकी देत असे. यामुळे एक पीडिता गरोदर असल्याची बाब निदर्शनास आली होती. ३० जुलै २०१८ रोजी पीडितेने फिर्याद देऊन पोलिसांना माहिती दिली.
यावरून आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल केला होता. पीडिताने दिलेल्या जबाब, साक्ष, अन्य एका पीडिताने तिच्यावर सुद्धा याच आरोपीने विनयभंग केल्याबाबत दिलेली साक्ष, अन्य साक्ष पुरावे, डिएनए रिपोर्टच्या आधारे आरोपी विरुद्ध असलेले आरोप सिद्ध झाले.
याप्रकरणात सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले होते. पीएसआय संजय कोरचे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. एलपीसी अनुराधा महल्ले व सीएमएस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.