चंद्रपूर : विदर्भातील सारस पक्षाला वाचविण्यासाठी चंद्रपूरात सारस समितीची स्थापना | पुढारी

चंद्रपूर : विदर्भातील सारस पक्षाला वाचविण्यासाठी चंद्रपूरात सारस समितीची स्थापना

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील १०३ सारस पक्षांपैकी उरलेल्या फक्त ४० सारस पक्षांना वाचविण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. नागपूर खंडपीठाने न्यायमुर्ती सुनील सुक्रे आणि अनिल पानपसरे यांनी ५ जानेवारी २०२२ रोजी सारस संवर्धन समितीची स्थापना करण्याचे आदेश पारीत करून राज्यशासनाला अवगत केले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत चंद्रपूरातील एका सारस पक्षाला वाचविण्यासाठी २ फेब्रुवारी २०२२ ला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे अध्यक्षतेखाली सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष चंद्रपूरचे जिल्हाधिकारी  अजय गुल्हाणे हे खुद्द आहेत.

गोंदिया येथील सेवा संस्थेने सारस पक्षांविषयी अभ्यास करून सारस पक्षी विदर्भातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे अभ्यासातून लक्षात आणून दिले होते. या अभ्यासाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि अनिल पानसरे यांनी ५ जानेवारी २०२२ दिलेल्या आदेशानुसार भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथील नष्ट होणाऱ्या सारस क्रेन पक्षाच्या संवर्धनासाठी सारस संवर्धन समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते.

चंद्रपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या सारस संवर्धन समिती मध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी  अजय गुल्हाणे स्वत: आहेत. सचिव म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर सदस्यांमध्ये विभागीय वन अधिकारी (चंद्रपूर वन विभाग), कार्यकारी अभियंता (जलसंपदा विभाग), जिल्हा अधीक्षक (कृषी विभाग), विभागीय वन व्यवस्थापक चंद्रपूर यांच्या समावेशासोबतच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सेवा संस्था गोंदियाचे अंकित सिंग ठाकूर, निमंत्रित सदस्य म्हणून ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे, इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे ह्यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यातील सारस पक्षांचे अस्तित्व, स्थिती, नष्ट होण्याची कारणे व उपाय सुचविणार आहे.

महाराष्ट्रात उरले 40 सारस

पृथ्वीवर आज केवळ २५,००० सारस पक्षी शिल्लक आहेत, २०१८ च्या सर्वेनुसार देशात पश्चिम बंगाल, आसाम, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात १४९३८ पक्षी शिल्लक आहेत.  परंतु चिंतेची बाबत म्हणजे ही संख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात आज केवळ ४० सारस पक्षी उरले आहेत ते फक्त विदर्भातील भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात केवळ भंडारा (०४) ,गोंदिया (३५) आणि चंद्रपूर (०१) जिल्ह्यातच सारस क्रेन पक्षी आढळले आहेत.

चंद्रपूर मध्ये 4 पैकी उरला 1 सारस

चंद्रपूर येथे २० वर्षापूर्वी जुनोना येथे ४ सारस पक्षी होते. १० वर्षापूर्वी केवळ १ पक्षी उरला होता. आता हा एकमेव सारस अनेक वर्षे राहून मागील वर्षीपासून तो दिसेनासा झाला आहे. विदर्भात १०३ सारस पक्षी संख्या होती ती आता घटून ४० झाली आहे. सारस पक्षांची संख्या सतत घटत असल्याचे गोंदिया येथील एका सेवा संस्थेने केलेल्या अभ्यासांती आढळून आले आहे. आयूसीएन संरक्षण स्थीती नुसार सारस क्रेन पक्षी संकटग्रस्त श्रेणीत आणि वन्यजीव अधिनियमा नुसार शेड्युल्ड ४ मध्ये येतो. जगात सारस हा उडू शकणारा सर्वात मोठा पक्षी आहे आहे, परंतु उच्च दाबाच्या वीज वाहिन्या, रायासानिक खते आणि कीटक नाशके, अंडी खाणारे कुत्रे आणि मांसभक्षी प्राणी, अंडी चोरने आणि बदललेली पिक पद्धती हे सारस पक्षाच्या नष्ट होण्याचे कारणीभूत घटक आहेत.

सारस क्रेन हा उडू शकणारा जगातील एकमेव पक्षी आहे. उत्तरप्रदेशाचा तो राज्य पक्षी आहे. त्याचा अधिवास तळे ,नदी, जवळील धानाची शेती आणि पाणथळ-गवताळ प्रदेशात असते. त्याची उंची ५ फुट आणि पंखांची लांबी ८ फुट, वजन ७ किलो असू शकते, हे पक्षी आयुष्यभर जोडी करून राहतात आणि वर्षातून पावसाळ्यात केवळ २ अंडी देतात. कित्येक किमीवरून पक्षांचा मोठा आवाज ऐकायला येतो. लाल मान आणि डोके असलेल्या ह्या पक्षांचा जीवनकाळ जवळजवळ २० वर्षाचा असतो . ह्यांना प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून भारतात प्राचीन काळापासून मानले जाते.

हेही वाचलतं का?

Back to top button