यवतमाळ : डॉ. धर्मकारेंवर गोळ्या झाडणार्‍या मुख्य आरोपीस २४ दिवसांनी अटक | पुढारी

यवतमाळ : डॉ. धर्मकारेंवर गोळ्या झाडणार्‍या मुख्य आरोपीस २४ दिवसांनी अटक

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा

उमरखेड येथील डॉ. हनुमंत धर्मकारेंवर ११ जानेवारी रोजी भरदिवसा गोळी झाडून त्‍यांचा निर्घुण खून करणाऱ्या मुख्य आरोपीस मध्यप्रदेशातील धार येथून अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तब्बल २४ दिवसानंतर त्‍याला अटक करण्यात यश आले. आज (शनिवार) पुसद येथील न्यायालयाने आरोपीस दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

डॉ धर्मकारे यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनेत सामील चौघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती मात्र, प्रत्येकवेळी मुख्य आरोपी हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. घटनेच्या तब्बल 24 दिवसांनंतर त्याला मध्य प्रदेशातील धार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने अटक केली. शहरातील पुसद मार्गावर मास्कधारी मारेकर्‍यांनी डॉ. धर्मकारे यांचा देशी कट्यातून गोळ्या झाडून खून केला होता. त्यानंतर आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी मुख्य मारेकरी शेख ऐफाज शेख अब्रार उर्फ अप्पू याच्या चार साथीदारांना अटक केली. होती.

त्यामध्ये त्याचा मामा सैयद तौसिफ सैयद खलील (वय ३५), सय्यद मुस्ताक शेख खलील (३२), शेख मोहसीन शेख कयूम (३४) शेख शाहरुख शेख कलम (२७) सर्व राहणार ढाणकी आदिंचा समावेश होता. मात्र मुख्य मारेकरी प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्याला अटक करण्यात यावी यासाठी व्यापारी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी उमरखेड बंद पाळला होता. एवढेच नव्हे तर शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केले होते.

पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असताना पोलिसांनी प्रत्येक परिस्थिती हाताळत मुख्य मारेकऱ्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू ठेवले. मुख्य आरोपी गजाआड झाल्याने हत्याकांडातील अनेक बाबी पुढे येणार आहेत.

Back to top button