पिठोरी पूजनासाठी वनस्पती होतायेत लुप्त; भाविकांची धावाधाव

पिठोरी पूजनासाठी वनस्पती होतायेत लुप्त; भाविकांची धावाधाव

सापाड : योगेश गोडे श्रावण महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या या नावाने ओळखली जाते. ठाणे जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीच्या भागात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठोरी देवीची विधिवत पूजन करून व्रत पूर्ण केले जाते. वंशवृद्धीसाठी आणि संतती प्राप्तीसाठी पिठोरी मातेचे पूजन केले जाते. त्यामुळे या पिठोरी अमावास्येला मातृदिन या नावाने सुद्धा ओळखले जाते. मात्र वाढत्या शहरिकरणामूळे जंगलांची होत असणारी कत्तल लक्षात घेता पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणार्‍या वनस्पती काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या असल्याची खंत पिठोरी व्रत साजरा करणार्‍या भाविकांकडून व्यक्त करण्यात आली.

पिठोरी मातेचे पूजन हे मुलांना दीर्घायुष्य मिळावे, यासाठी करण्यात येते. पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणारी वनस्पती जंगल-डोंगर भागात उगवत आसल्याने अनेक भक्तजन या विधिवत पूजनासाठी लागणार्‍या वनस्पतीच्या शोधत डोंगर कपार्‍यात गवसणी घालतात. पूजेची वनस्पती घेऊन आलेले भक्तजन सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते.

तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य पिठोरी मातेला दाखवण्यात येतो. नैवेद्यात वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. आशा विधिवत व्रत ठाणे जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीच्या भागात केली जाते.

पिठोरी मातेच्या पूजनासाठी लागणारी वनस्पती गावाशेजारी असणार्‍या जंगल भागात सहजपणे उपलब्ध होत होती. जंगलाचे सिमेंटच्या जंगलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे बहुतांशी वनस्पती ह्या डोंगर भगत मिळत नसल्याने आम्ही नाराज झालो आहे.
-कपिल निळजेकर (पिठोरी मातेचं व्रत करणारे भक्त)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news