

ठाणे : संतोष बिचकुले कुरिअरद्वारे आलेल्या पार्सलच्या डिलिव्हरीचा 10 रुपयांचा सर्व्हीस चार्ज लिंकच्या माध्यमातून भरणे डोंबिवलीकर अमितला (बदलेले नाव) महागात पडले. भामट्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करताच अमितच्या मोबाईलचा अॅक्सेस भामट्याला मिळाला आणि त्याने बँक खात्यातून 96 हजार 999 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र ठाणे सायबर क्राईम गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे त्याला 81 हजार रुपये परत मिळाले, अशी माहिती ठाणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
डोंबिवली पूर्व परिसरात राहणार्या व्यक्तीचे नामांकित बँकेत खाते आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बँकेत चेकबूकसाठी अर्ज केला होता. सदर चेकबूक कुरिअरद्वारे येणार असल्याचे बँक कर्मचार्यांनी त्यांना सांगितले. दरम्यान त्या व्यक्तीच्या मोबाईलवर कुरिअर कंपनीतून फोन आला. आपले चेकबूक आले आहे, चेकबूकच्या पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी 10 रुपये चार्ज भरावा लागेल, असे कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याने सांगितले.
अमितने विश्वास ठेवून त्या कर्मचार्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करताच त्याच्या मोबाईलचे अॅक्सेस भामट्याला मिळाले. त्याद्वारे भामट्याने बँक खात्यातून 96 हजार 999 रुपये ट्रान्सफर केले आणि 81 हजार रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल भरले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमित याने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलम वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र नेगी व पोलीस पथकाने सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीद्वारे भामट्याने यूपीआय आयडीद्वारे 81 हजार रुपयांचे के्रडिट कार्डचे बिल भरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार के्रडिक कार्ड कंपनीशी पत्रव्यवहार करून सदर रक्कम अमितच्या बँक खात्यात परत जमा
करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ऑनलाईन लुटणारे भामटे पूर्वी बँक खात्याची केवायसी अपडेट, विद्युत बिल भरण्याच्या नावाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत होते. आता या भामट्यांनी कुरिअर कंपन्यांकडे मोर्चा वळवला आहे. कुरिअर कंपन्यांचा डाटा मिळवून हे भामटे सर्रास नागरिकांना लुटू लागले आहेत. त्यामुळे सावध राहिले पाहिजे. कुरिअर कंपन्यांकडून सर्व्हीस चार्जसाठी लिंक पाठवली जात नाही, हे कायम लक्षात ठेवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलम वाव्हळ यांनी नागरिकांना केले आहे