

ठाणे : दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुलभ, पारदर्शक व गतिमान पद्धतीने व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषदेत ई-ऑफिस कार्यप्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे.
ई-ऑफिस कार्यप्रणालीच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजात सुसूत्रता आली असून, आता कागद हद्दपार होऊन पेपरलेस कामकाज सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेमध्ये दररोज 300 ते 400 टपाल आवक-जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचार्यांच्या हस्ते पारंपरीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जात होते. त्यामुळे अनेकदा टपाल विभाग प्रमुखांपर्यंत पोहोचलेले नसत, कधी कधी टपाल गहाळ होत, तर कधी कर्मचार्यांनाही टपालाचे काय केले, याची माहिती नसल्याचे पुढे येत असे. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे आग्रही होते.
सहा महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेत ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि कर्मचार्यांचे अज्ञान यामुळे ई ऑफिसवर काम करताना अनेक अडथळे येत होते. त्यामुळे तांत्रिक उणिवा दूर करण्यासह अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अखेर ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. आता, नवीन येणारे प्रस्ताव किंवा निर्णायाची अंमलबजावणी ई-प्रणालीद्वारे होत आहे. यामुळे कामकाजाला गती मिळण्यासह जिल्हा परिषदेत नस्ती आणि कागदांचा वापर कमी झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी याकामी लक्ष केंद्रीत करत ई प्रणाली सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
ई ऑफिस कार्यप्रणालीमध्ये कामाचा प्रस्ताव तयार करून तो लगेचच संबंधित अधिकार्यांमार्फत संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड केला जातो. या कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव एक ते दोन दिवसात मार्गी लागण्यास मदत होते. प्रत्येक प्रस्तावाला ई-नंबर दिला जातो. त्यामुळे संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकार्यांच्या स्तरावर आहे किंवा त्यास विलंब झाला याचे देखील ट्रेकिंग ठेवण्यात येते.