Thane News : मंत्री योगेश कदम यांच्याकडे ठाणे आणि पालघरची सूत्रे, शिवसेनेचे २२ जिल्ह्यात संपर्क मंत्री अभियान

Thane News: Yogesh Kadam Gets Charge of Thane & Palghar; Shiv Sena Launches Contact Minister Drive in 22 Districts
Published on
Updated on

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आगामी ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आक्रमक ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आले असून त्याची जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले असून “संपर्क मंत्री अभियान” हे केवळ अभियान राबविणार आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये संघटन झपाट्याने मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी टाकत “जिंकाच, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री यांच्या नंदनवन या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री उशिरा प्रमुख मंत्र्यांची, पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत देण्यात आला.

ठाणे आणि पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होत असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोरे , माजी मंत्री कपिल पाटील हे सक्रिय आहेत. भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविताना शिवसेनेला आव्हान उभे केले आहे. त्यामुळे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन ठाणे, पालघर जिल्हावर भगवा फडकविण्यासाठी सेनेने प्रयत्न सुरू केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कामगिरी पाहता नामदार कदम यांच्यावर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देऊन भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

राज्यातील मागील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेनेने राज्यात क्रमांक दोनचा पक्ष म्हणून भक्कम स्थान मिळवले होते. या यशामुळे पक्षाच्या कामगिरीबाबत अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्याचबरोबर जबाबदारीही अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका केवळ पुनरावृत्तीची संधी नसून, आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याची आणि पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची निर्णायक लढाई म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळेच पक्षाने यावेळी अधिक आक्रमक, नियोजनबद्ध आणि लक्ष्यकेंद्री रणनीती अवलंबत प्रत्येक स्तरावर विजय सुनिश्चित करण्याचा निर्धार केला आहे.

या अंतर्गत गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड व हिंगोली, भरतशेट गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर व वर्धा, शंभुराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांवर भगवा फडकवणे हे अंतिम लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट फिक्स करून निवडणुकीची काटेकोर तयारी करायची, विजयाची टक्केवारी वाढवायची आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधून त्यांना पूर्ण ताकद द्यायची ही पहिली अट आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व आक्रमकपणे वाढवायचे, यासाठी स्थानिक खासदार, आमदार आणि संपर्क प्रमुख यांच्याशी थेट समन्वय साधायचा असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत, तिथेही मागे हटायचे नाही शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news