

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील साता समुद्रापार गेलेली लिम्काबुक प्राप्त आजीबाईंची शाळा ही जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. याच आजीबाईंचे संपूर्ण जीवन काव्यरूपाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रकाशित होत आहे.
८ मार्च २०१६ रोजी फांगणे येथे श्रीमती इंदुमती मोतीराम दलाल यांच्या शुभहस्ते या आजीबाईंची शाळा सुरु करण्यात आली. या शाळेत येणाऱ्या ३२ आजीबाई यांचे संपूर्ण जीवनदर्शन कवितेच्या रूपाने मांडण्याचे काम इतिहास संशोधक लेखक वक्ते, कवी शिक्षक योगेंद्र बांगर यांनी केले आहे.
आजीबाईंची शाळा हा जागतिक स्तरावर नोंद झालेला शिक्षणातील आणि सामाजिक जाणिवेतून आविष्कृत झालेला एक अभिनव प्रयोग आहे. शिक्षक योगेंद्र शांताराम बांगर यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरु झाली. परंपरा आणि परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता आले नाही अशा आजींना शिक्षणाचे धडे देणारी फांगणे येथील आजीबाईची शाळा ही आज सर्वदूर पोहोचली. या आजींचे भावविश्व व स्वभावचित्र साकारणारा योगेंद्र बांगर लिखित काव्यसंग्रह जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आजींच्या राहिलेल्या या एका स्वप्नाची पूर्तता होणार आहे. आजींचे स्वप्न पूर्ण करण्यास करण्यास सदर काव्यसंग्रहाचा हातभार लागणार आहे. कवी योगेंद्र बांगर, शिक्षिका शितल मोरे व प्रकाशक कंपनीने पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे