

वाढते कर्करोगाचे रुग्ण आणि त्याची भीती दाखवून तरुण मुलीसह वय वर्षे ४५ पुढील महिलांचे काढले जाणारे गर्भाशय ही समस्या जवळपास १० टक्के महिलांमध्ये दिसून येत आहे. गभर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया सर्रास होऊ लागल्याने गर्भाशय काढलेल्या महिलांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा एक प्रकारे हामर्मोन्स आणि किडनीवर मोठा परिणाम होत असल्याचे पुढे येत आहे. मोठमोठ्या रुग्णालयांत विमा धारक महिलांच्या अशा शस्त्रक्रिया करून रुग्णालये पैसे मिळवत आल्याचेही दिसून येते. डॉक्टरांच्या कट प्रक्टिसमधून हे प्रकार घडत आहेत.
साधारणतः, २५ ते तिशीतील लग्र होऊ न शकलेल्या महिलांना गर्भाशयातील फायबर गाठींचे कारण पुढे करून गर्भाशय काढले जात आहे. यामागची नेमकी कारणे काय याचा शोध घेतला असता गर्भाशयाचे रोपण हे शक्य नसले तरी शस्त्रक्रियेतून पैसे मिळणार हेही यामागचे कारण असू शकते. महाराष्ट्रात ऊसतोड कामाला महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने येतो. मात्र, या कामामध्ये महिलांसमोर अनेक समस्या उभ्या राहतात. मूल होऊ नये किंवा मासिक पाळीचे त्रासहोऊ नयेत यासाठी ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी मोठ्या प्रमाणात काढून टाकल्याचे निदर्शनास आले होते.
महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात असे प्रकार पहले होते. २०१९ला याबाबत जोरदार चर्चा घडल्या, तथापि, त्यांनंतरही हे प्रकार थांबल्याचे दिसत नाही. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक, शारीरिक प्रक्रिया आहे. मात्र या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संसर्गाच्या अडचणी उद्भवू शकतात. अशा कारणांमुळेही गर्भाशय काढून गर्भपिशवीमध्ये बऱ्याचदा फायबर गाठी दिसून येतात. मात्र या गाठी कॅन्सरच्या असू शकतात, असे सांगून बर्याच रुग्णालयांत गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
याबाबत डॉ. सचिन जायभाये यांना विचारले असता ते म्हणाले, गर्भाशयामध्ये सततचा रक्तस्राव होत असून, यामुळे रुग्णाला रक्तपुरवठा करण्यापर्यंतची स्थिती येत असेल तर अशा अपवादात्मक वेळी गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचेही निदान होते. अशावेळीही गर्भाशय काढणे हा पर्याय असतो. मात्र अन्य कारणामुळे गर्भाशय काढण्याचे प्रकार होत असतील तर ते गैर आहे.
ऊस तोडणीमध्ये सहभागी होण्यासाठी गर्भाशय काढावे लागणे ही अट आहे, असे मुकादमाकडून सांगितले गेले आणि महिलांची सर्रास गर्भाशये काढली गेली. हा प्रकार २०१९ च्या एप्रिल महिन्यात उघडकीस आला होता, या महिलांची काही प्रकरणे अभ्यासली गेली. त्यामध्ये नवीन बाजू पुढे आली. त्यामध्ये महिलांना गर्भपिशवी काढण्याची जबरदस्ती केली गेली नव्हती. मात्र खासगी डॉक्टर पिशवी काढण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करत होते, असे पुढे आले.
मासिक पाळीमुळे काम बुडते आणि दिवसाचा पगार मिळत नाही म्हणूनही या महिलांनी गर्भाशय काढल्याचे आढळून आले. पस्तिशी ते चाळीशी उलटलेल्या महिलांना मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये किरकोळ कारणासाठी गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मुंबईसारख्या शहरातही गर्भाशय काढण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या घरात आहे. गर्भाशय काढलेल्या महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळते.
विशेषतः मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा गर्भाशय काढण्याचा सल्ला ऐकला आहे. बऱ्याचदा कंत्राटी स्वरूपात असलेल्या महिला कामगार यांचे गर्भाशय काढले आहेत. पस्तिशीच्या एका महिलेला याबाबाबत विचारले असता, डॉक्टरांनी कर्करोगाचा धोका सांगितल्याने आपण गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे दुष्परिणाम आता जाणवतात, असे सांगितले.
अलीकडे सर्रास किरकोळ तक्रारीवरूनही गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे गैर आहे. अॅलोपॅथीमध्ये जेव्हा काही उपाय होत नाहीत, त्यावेळी आयुर्वेदातील औषधातून हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, आजच्या सुपरफास्ट जमान्यात थांबण्याची सोय कुणालाच नाही. त्यामुळेच गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
डॉ. मिलिंद कुलकणी, एम.डी. आयुर्वेद, सिधुदुर्ग