

शहापूर : शहापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरून तपासणी करण्याच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शाळेला भेट देवून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.
शहापूर येथील आर. एस. दमानिया इंग्लीश स्कू लमध्ये मुख्याध्यापिकेसह सहा शिक्षिका, एक शिपाई एक स्वच्छता कर्मचारी यांनी 12 विद्यार्थिनींचे कपडे उतरून तपासणी केली होती. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढत या प्रकरणाचा जाब विचारला होता. आठ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवत त्यांना अटक केली आहे. त्यांना 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून जबाबदार शिक्षक कर्मचार्यांची चौकशी सुरू झाली आहे.
स्वच्छतागृहामध्ये रक्ताचे डाग दिसल्यावरून हे प्रकरण सुरू झाले आणि अल्पवयीन मुलींची महिला शिक्षिका आणि महिला कर्मचार्यांकडून विवस्त्र करून तपासणी करण्यात आली. कुठल्या मुलीची मासिक पाळी सुरू आहे, याचा शोध घेण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून संतप्त पालकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
आर. एस. दमानी शाळेत सहाशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेच्या शौचालयात रक्ताचे डाग आढळून आल्याने कोणत्या विद्यार्थिनीस मासिक पाळी आली व ते डाग नेमके कुठल्या विद्यार्थिनींचे आहेत याबाबत प्राचार्या गायकवाड यांनी विचारणा केली. या गंभीर प्रकाराने धास्तावलेल्या विद्यार्थिनी एकदम स्तब्ध झाल्याने प्राचार्यांनी शाळेमधील महिला कर्मचार्यांच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावीच्या सगळ्याच विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्यास सांगितल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्या आदेशाचे पालन करत विद्यार्थिनींचे कपडे काढून त्यांना मासिक पाळी आली आहे की नाही हे तपासण्यात आले.
या प्रकरणातील कळस म्हणजे शाळेमध्ये पाण्याचा अभाव असल्याने मुलींनी भिंतीला पुसलेल्या रक्ताचे डाग प्रोजेक्टरमधून दाखवले व विद्यार्थिनींच्या बोटाचे ठसेही घेतले असल्याची माहीती मुलींनी त्यांच्या पालकांना दिली. शाळा प्रशासनाच्या या भयंकर प्रकाराबद्दल संतप्त झालेल्या पालकांनी एकत्र येऊन काल सकाळी थेट दमानी स्कूल गाठून प्राचार्यांना घेराव घालून जाब विचारला.
दरम्यान संतप्त पालकांचा रुद्रावतार पाहून प्राचार्यांनी पोलिसांना पाचारण केले. यामुळे शालेय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. यावेळी शहापूरचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न करत संस्थाचालकांना व गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संस्थाचालकांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर पालकांनी आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला. विद्यार्थिनींची मानसिक स्थिती ढासळलल्यावर कारवाई करणार का, संस्था चालकांना बोलवा, आम्हाला न्याय पाहिजे अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा पालकांनी दिल्यामुळे संस्था चालकांबरोबर झाल्या प्रकाराबाबत बोलणं झाले.
तथापि प्राचार्यांना निलंबित करण्याबाबतचे पत्र पाठवत प्राचार्या माधुरी गायकवाड यांच्यासह चार शिक्षक, दोन विश्वस्त आणि एक मावशी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत 8 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 15 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे शहापूरचे उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
शाळांमध्ये सोयी - सुविधांचा अभाव असल्याचे निष्पन्न झाले असून विद्यार्थिनींबाबत घडणारे असे घृणास्पद प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देत शहापूरातील या संस्थेची मान्यताही रद्द करावी लागेल असे सूचक वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. तालुक्यातील दमानी हायस्कूलमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींच्या संदर्भातील बिभीत्स प्रकरण समोर आल्याने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शहापूर पोलीस स्थानकास भेट देत या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पालकांशी देखील त्यांनी संवाद साधला.
तथापी या शाळेत घडलेल्या या बिभीत्स प्रकारामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनी व पाल्यांच्या चिंतेने धास्तावलेले पालक यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या या भेटीमुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर याच दरम्यान या प्रकाराबाबत तहसीलदार व डीवायएसपी यांनी संस्था चालकांशी संपर्क साधला. मात्र दोन संचालकांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी मिलिंद देशमुख यांनी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे यावेळी केली.
आर.एस.दमानी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे शाळेतील अध्यापन सध्या बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान उत्तम व्यवस्थापनासह शाळा सुरू करावी अशी मागणी पालकांनी केली. पर्यायाने शाळेच्या स्वच्छता गृहात मुबलक पाण्याची व्यवस्था करावी, लाईटची सेवा 24 तास असावी, वर्गांमध्ये व शालेय परिसरात स्वच्छता राखावी, शाळेमध्ये पॅड विघटक मशीन ठेवणे, पालकांसाठी खर्चिक ठरणारे प्रोजेक्टचे फॅड बंद करावे जेणेकरून आई-वडिलांचा वेळही वाचेल, पैसेही वाचतील शिवाय विद्यार्थी टॉर्चर होण्यापासून वाचतील.
दमानिया स्कूल ही शासनाच्या शिक्षण विभागाच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय व घाणेरडा असून यात आठ जणांवर पोक्सोे अंतर्गत कारवाई करण्यात आली. उर्वरित आरोपींना देखील लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी करून अटक केली जाईल. तसेच शक्य असल्यास या शाळेची मान्यताही रद्द करण्यात येईल.
रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग