Maharashtra politics | भाजप-ठाकरे पुन्हा सुत जुळतेय का?

राजकारणात काहीही होऊ शकते; घडामोडी काय सांगतात?
Uddhav Thackeray,Shiv Sena-BJP
Maharashtra politics | भाजप-ठाकरे पुन्हा सुत जुळतेय का?file photo
Published on
Updated on

शशिकांत सावंत, ठाणे

नागपूर अधिवेशनात देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांची झालेली भेट आणि गुरुवारी 9 जानेवारीला आदित्य ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट. 10 जानेवारीला एका मुलाखतीत राजकारणात काहीही होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान, या घडामोडी काय सांगतात? खरंच, ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

महापालिकांच्या निवडणुका दोन महिन्यांत होतील, असे सांगितले जात आहे. यासाठी काही पक्ष स्वबळाचे तर काही पक्ष युती- आघाड्यांचे गणित सांगत आहेत. ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीपासून चार पावले दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसर्‍या बाजूला आदित्य ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ठाकरे कधी इकडे तर कधी तिकडे यापूर्वी होते, असे सांगत राजकारणात काहीही घडू शकते, असे दिलेले संकेत हा सारा राजकीय घडामोडींचा सिलसिला पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही नवे घडण्याचे तर हे संकेत नाहीत ना, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. खरे तर भाजप आणि शिवसेना हे पक्ष 2019 निवडणुकीनंतर एकमेकांपासून दुरावले. यानंतर शिवसेनेत फूटही पडली. लोकसभा आणि विधानसभेला ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीबरोबर तर शिंदेेंची शिवसेना महायुतीबरोबर राहिली. लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीच्या 31 जागांच्या विजयासह महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला; तर विधानसभेला लाडकी बहीण योजनेचे गारुड महाराष्ट्राने पाहिले. महायुतीच्या एकदम 230 जागा आल्या आणि मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडी पुरती निष्प्रभ झाली. ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर समाधान मानावे लागले. या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाराष्ट्रात राजकीय हालचल होेणे स्वाभाविक ठरले. मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे काहीसे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. या सार्‍या नव्या समीकरणात पुन्हा एकदा ठाकरे - फडणवीस यांच्यात जवळीक होत असल्याचे पाहायला मिळाले आणि नव्या चर्चांना धुमारे फुटले. केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने काही मित्र पक्षांच्या मदतीवर सरकार उभे आहे. नवा मित्र पक्ष मिळणे हे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. अशा स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले 9 खासदार केंद्रात भाजपसाठी तारक ठरणारे आहेत. या एकाच मुद्द्यावर ठाकरे - भाजप सुत पुन्हा एकदा जुळून येऊ शकते, असे म्हणायला जागा आहे. राज्यात महायुतीसोबत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे लोकसभेचा एकमेव खासदार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवारांची रणनीती आहे. त्याला अद्याप तरी यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे कोणती जन्माला येतात, हे पाहणेही औत्सुक्याचे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news