

ठाणे : प्रवीण सोनावणे
गेल्या काही दिवसांत ठाण्यात कचर्याची समस्या गंभीर झाली असून कचरा टाकायलाही ठाणे महापालिकेला जागा उपलब्ध करता आलेली नाही ही गंभीर बाब आहे. कचर्याची ही समस्या आजची नसून स्मार्ट सिटी अशी ओळख करू पाहणार्या ठाणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून कचर्याची समस्या प्रशासनाला सोडवता आलेली नाही.
वर्षाला 500 कोटींपेक्षा अधिक खर्च महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर करते. याशिवाय अधूनमधून कोट्यवधींचा खर्च होतो तो वेगळा. आतापर्यंत कचरा निर्मूलनाचे अनेक प्रयोग अक्षरशः फसलेले असून महापालिकेचे कोट्यवधींचे रुपये पाण्यात गेले आहे. एवढ्या वर्षात ठोस उपाययोजना करण्याऐवजी यामागे अर्थकारणच जास्त झाले असल्याचा आरोपही वारंवार यापिर्वी झाला असल्याने शहराचा कचरा करणारे जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आता इथल्या प्रशासनाला आणि राजकीय मंडळींना आली.
ठाण्यात गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अक्षरशः कचराकोंडी पाहायला मिळाली. डायघरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. तर दुसरीकडे सिटी टँक तलाव परिसरात कचरा टाकणे बंद झाल्याने कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न प्रशासनाला पडला असल्याने सोसायटी आणि रस्त्यावर अक्षरशः कचर्याचे ढीग पाहायला मिळाले. मात्र ही समस्या आजची नसून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ठाणे महापालिकेला ही कचर्याची समस्या सोडवता आलेली नाही. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात येऊ घातले आहेत . स्मार्ट दिशेकडे वाटचाल करणार्या ठाण्याला हायटेक बनवण्याचे मनसुबे ही आखण्यात येत आहेत .मात्र एवढ्या वर्षात ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड निर्माण करता आले नाही ही मोठी शोकांतिका आहे .
1995-96 साली महापालिकेने कोपरी येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या , मात्र येथील रहिवाश्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला . 2004 साली डायघर या ठिकाणी महापालिकेने 19 हेक्टर ची जागा घेतली ,ज्यावर घनकचरा प्रकल्प उभारणीची तयारी महापालिकेनं सुरु केली तर याचठिकाणी 500 मेट्रिक टन वर प्रक्रिया करण्याची योजना महापालिकेनं आखली. 2008 साली या ठिबकचा प्रकल्प सुरु झाला आणि वेळोवेळी रहिवाशांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला , ज्यामध्ये अनेक वेळा हिंसक आंदोलन सुद्धा झाली. त्यातच राजकीय पक्षांचं पाठबळ लाभल्याने आंदोलनांना अधिक जोर आला. शेवटी, या ठिकाणी वास विरहित, प्रदूषण विरहित प्रकल्प सुरु करण्याचा निणर्णय 2015 साली झाला मात्र तोही बारगळला .डायघर प्रकल्प सुरु न झाल्याने अखेर महापालिकेने 2013 साली तळोजा या ठिकाणी एम एम आर डी या च्या मदतीने जागा घेतली ,मात्र अद्यापही महापालिकेच्या ताब्यात हि जागा येऊ शकलेली नाही.
ठाणे शहरात 1000 मॅट्रिक टन कचर्याची निर्मिती होते . यापैकी 200 मॅट्रिक टन कचरा हा बांधकामाचा आहे . त्यानंतर 800 मॅट्रिक टन कचर्यापैकी 425 मॅट्रिक टन कचरा हा ओला कचरा असून 375 मॅट्रिक टन कचरा हा सुखा कचरा आहे . सध्या सुका कचरा गोळा करण्याची 100 मेट्रिक केंद्र कार्यरत आहेत. ज्यामध्ये 10 ते 15 % सुका कचरा सोडला तर बाकीचा अश्या स्वरूपातील कचरा या ठिकाणी गोळा होतो. 425 मेट्रिक टन कचर्यापैकी गृहसंकुल 80% कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवतात . तर , उर्वरित 60% कचरा हा विविध इंधनासाठी महापालिकेतर्फे प्रकल्पात वापरण्यात येतो, आणि यातील काही प्रकल्प हे शहरातील तीन वसाहतींमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे फक्त 285 मेट्रिक टन कचरा हा दिव्यामधील खाजगी जागेमध्ये टाकण्यात येतो.
शहरात कचर्याची समस्या झुजवंत ठेवण्यामध्ये इथले राजकीय नेतृत्व देखील तितकेच जबाबदार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकवेळी कचर्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात येते. कचर्याच्या मुद्द्यावरून राजकारण देखील रंगते. मात्र ही समस्या कायमसस्वरूपी सोडवण्यात इथले राजकीय नेतृत्व देखील कमी पडले असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.