

नेवाळी ( ठाणे ): ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची रविवारी (दि.6) सकाळपासून संततधार सुरु आहे. मुसळधार संततधार कोसळणार्या पावसात अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील नदी पात्रात पर्यटकांच्या ओल्या पार्ट्या सुरु असल्याचे दिसून आले आहे.
श्री मलंगगड भागातील कुशिवली, खरड, ढोके गावाच्या परिसरात अति उत्साही पर्यटक नदी पात्रात कुठे उड्या मारत आहेत तर कुठे ओल्या पार्ट्या करत नदीतील पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. मात्र त्यांचा अतिउत्साह हा जीवावर बेतण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास पर्यटकांकडून मोठा आनंद पर्यावरणाच्या कुशीत साजरा केला जात आहे. मलंगगडच्या नदी पात्रात रविवारी पर्यटक आनंद साजरा करताना दिसून आले आहेत. तर काही जर थेट नदी पात्रात ओल्या पार्ट्या करताना दिसून आले आहे. मुसळधार पावसात नदीच्या पाणी पातळीत काही वेळातच वाढ होते. मात्र असं असताना देखील जिल्हा प्रशासनाकडून मलंगगड भागात पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या काळजीपूर्वक सूचना दिल्या जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकताच एका पर्यटकाचा अंभे गावाजवळ नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. तर दरवर्षी मलंगगड भागात नदी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांचे जीव जाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या मलंगगड भागातील पर्यटकांच्या सुरु असलेल्या अति उत्साहाला वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणार्या मलंगडगच्या नदीला काही वेळच्या पावसात रौद्ररूप धारण करते. नदीच्या पाणी पातळीत काही क्षणात वाढ होत असल्याने स्थानिकांडून पर्यटकांना नदी पात्रात न उतरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र काही अतिउत्साही पर्यटक नदी पात्रात ओल्या पार्ट्या करून जीवावर बेतणारा आनंद साजरा करताना दिसून येत आहे.
रविवारी (दि.6) मलंगगड रोड वरील ढोके गावाजवळ असलेल्या पुलाखाली काही पर्यटक ओल्या पार्ट्या करताना दैनिक पुढारीच्या कॅमेर्यात कैद झाले आहेत. त्यामुळे अश्या अतिउत्साहींवर वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मलंगगड भागात पर्यटकांचे जीव जाण्या आधीच जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.