

ठाणे : दिलीप शिंदे
मुंबई , ठाणे जिल्हाची तहान भागवणार्या शहापूर तालुक्यातील 30 गावे आणि 119 पाड्यांवरील तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर मुरबाड तालुक्यातील 5 गावे आणि 8 पाड्यांवर तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. डोक्यावर सूर्य देव आग ओकत असताना 35 गावे 127 पाड्यांमधील 58 हजार गरीब, आदिवासी जनतेला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी दोन ते पाच किलो मीटर भटकंती करावी लागत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या आणि कागदावर रेखाटलेल्या पाणी पुरवठा योजना ह्या कोरड्या राहिल्याने आदिवासींना जगण्यासाठी दररोज 47 खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढताना दिसत आहे. काही पाड्यांवर दोन दिवसांनी टँकर जात असल्याने पाण्याच्या थेंबासाठी कुणावर प्राण गमावण्याचा बाका प्रसंग ओढवला तर आश्चर्य वाटू नये, अशी बिकट परिस्थिती धरणांच्या तालुक्यात निर्माण झालेली दिसून येते.
तीन कोटी मुंबई, ठाणेकरांची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या शहापूर तालुक्यात आहे. मात्र त्याच शहापूरमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, यावर कुणाचा विश्वास बसत नाही. पण जसे दिसते, तसे नसते, या उक्तीची प्रचिती शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीवरून येते.
शहापूर तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणा ही महत्वाची धरणे आहेत. या धरणातून होणार्या पाणी पुरवठ्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तीन कोटी लोकांची दररोज तहान भागविली जाते. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शेजारील या आदिवासी तालुक्यातील जनतेला दोन वेळा मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन वणवण भटकावे लागत आहे. पाण्याच्या एका हंड्यासाठी डोंगर चढताना रखरखत्या उन्हाच्या त्रासाने अनेकाना प्राण गमावण्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तरी देखील राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. फक्त कोरडी आश्वासने आणि कागदी योजनांचा पूर आलेला दिसून येतो.
देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वर्ष साजरा होत असतानाही पाण्याच्या एका थेंबासाठी जनतेला प्राण गमवावे लागते, ही एक मोठी शोकांतिका आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना कागदावर राहिल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे अहवाल तयार होतात आणि राज्यकर्ते श्रेयाच्या लढाईत मश्गूल राहतात.
यावर्षी देखील ठाणे जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार असून त्याकरीता जिल्हाधिकार्यांनी 11कोटी 33 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. आजमितीला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईग्रस्त गावे आहेत.
आजच्या दिवशी शहापूर तालुक्यातील 30 गावे आणि 119 पाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भातसा नदीतून पाणी उचलून टँकरद्वारे या गाव पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. ही सगळी गावे आणि पाडे धरणांच्या आजूबाजूच्या क्षेत्रामधीलआहेत. अनेक आंदोलने, बैठका होवूनही मुंबई महापालिकेकडून या गावांना पाणी दिले जात नसल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे. गेल्या अनेक दशकापासून शहापूरकरांनी आम्हाला मुबलक पाणी द्यावे अन्यथा धरणांचे पाणी तोडू असे अनेकदा इशारे दिले. मात्र गरिबांचे कोणी वाली नसून त्यांचा आवाज नेहमीच दाबला गेला. रात गयी बात गयी या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाने आंदोलने मोडीत काढली आहेत. आवाज चिरडला आहे. परिणामी कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊनही पाणीटंचाईचा प्रश्न गेल्या अनेक दशकापासून तसाच कायम राहिलेला दिसून येतो.शहापूर प्रमाणे शेजारील मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई असून आजच्या घडीला पाच गावे आणि 8 पाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे या गावांना एमआयडीसी द्वारे पाणी दिले जात आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी भावली धरणाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने पाणीटंचाईचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. या धरणाच्या राजकारणात अनेक निवडणुका झाल्या आणि आमदारांनी आपापल्या पोळ्या भाजून घेतल्या. प्रत्येक सरकारने आम्ही हा प्रश्न सोडवू असे सांगून आदिवासी जनतेची फसवणूक सुरूच ठेवण्याची परंपरा मोडीत काढण्याची हिंमत दाखविलेली नाही.