

ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहसी क्रीडापटू आणि पॅराजंपर अजित बळीराम कारभारी यांनी आषाढी एकादशीनिमित्त एक आगळीवेगळी, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. 6 जुलै 2025 रोजी त्यांनी रशिया येथील 13000 फूट उंचीवरून आकाशात पॅराशूटसह 410 हवाई जहाजातून उडी घेतली.
विशेष म्हणजे, या दिवशी त्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता आणि हातात राम कृष्ण हरी-विठ्ठलाची प्रतिमा असलेले ध्वज फडकावत विठ्ठलनामाचा जागतिक जयघोष केला.
अजित कारभारी हे उंबर्डे गावातील कुस्तीपटू बळीराम कारभारी यांचे सुपुत्र असून, ते सध्या ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या साहसी मोहिमेसाठी त्यांना रशियन मिलिटरीचे मुख्य प्रशिक्षक कोस्त्या क्रीवोत्सिव यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. अजित कारभारी यांनी त्यांच्या या साहसी पॅराजंपद्वारे एक गूढ आणि पवित्र असा अध्यात्मिक संदेश दिला आहे, की भक्ती हा केवळ देवभक्तीचा मार्ग नाही, तर ती जीवनाला दिशा देणारी, प्रेरणा देणारी आणि देशसेवा करण्याची ऊर्जा देणारी शक्ती आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा वारकरी परंपरेचा झेंडा आंतरराष्ट्रीय आकाशात फडकवला गेला असून, श्रद्धा, साहस आणि देशप्रेम याचा सुंदर संगम या कार्यातून साकार झाला आहे. अजित कारभारी यांचे हे कार्य प्रेरणास्त्रोत ठरत असून, युवा पिढीला भक्ती व साहस यांचा समन्वय साधत राष्ट्रकार्याची प्रेरणा देणारे आहे.
अजित कारभारी यांनी यापूर्वी सतराशे फूट आकाशातून रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे - 36ओ सेल्सिअस तापमानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या ध्वज फडकवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी मानवंदना दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल माऊलीला मानवंदना देण्यासाठी रशिया येथील 13 हजार फूट उंचीवरून आकाशात पॅराशूटसह 410 हवाई जहाजातून उडी घेतली.