

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा विशाल गवळी याने रविवारी पहाटे तळोजा कारागृहातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची प्राथमिक चौकशी केल्यानंतर विशालचा मृतदेह तळोजा कारागृहातून मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर तेथून पोलिस बंदोबस्तात विशालचा मृतदेह सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणण्यात आला. तेथे त्याच्या मृतदेहावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बदलापूरमध्ये एका शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार बदलापूर परिसरातील स्मशानभूमीत वा तेथील मातीत करू नये, अशी आक्रमक भूमिका बदलापूकरांनी घेतली होती. अनेक दिवस अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार स्मशानभूमीच्या जागे अभावी रखडले होते. अखेर उच्च न्यायालयाला अंत्यसंस्काराच्या जागेसाठी हस्तक्षेप करावा लागला होता. तसा प्रकार विशाल गवळीच्या बाबतीत घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाने कमालीची गुप्तता बाळगली होती. उत्तरीय तपासणी केल्यानंतर विशालचा मृतदेह कल्याणमध्ये कधी आणला जाईल, याची कोणतीही माहिती पोलिस वा रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती.सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशालचा मृतदेह विठ्ठलवाडी स्मशानभूमीत आणला जाईल, असे त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मुंबईतील रूग्णालयाकडून कळविण्यात आले.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ स्मशानभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला. मध्यरात्रीच्या सुमारास मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विशालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले
विशाल गवळीने आत्महत्या केली नाही. विशालची तुरूंगात हत्या झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. विशाल गवळीला बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणे मारण्यात आले आहे. विशाल गवळी याने आत्महत्या केलेली नाही. त्याला तुरुंगात कुणीतरी मारले असल्याचा संशय त्याचे वकील संजय धनके यांनी व्यक्त केला आहे.
विशाल गवळीने फाशी घेऊन आत्महत्या केली. मात्र त्या ऐवजी सरकारने त्याला अटक झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत फासावर लटकवले असते तर असे गुन्हे करणाऱ्यांच्या उरात धडकी भरली असती. जर त्याला भर चौकात फाशी दिली असती तर आम्ही नक्कीच आनंद साजरा केला असता, अशी प्रतिक्रिया पिडीत बालिकेला तिच्या पश्चात न्याय देण्यासाठी मोर्चा आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिली.