

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानात सहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीप (sweep) अंतर्गत मतदार, मतदान जनजागृती करण्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी सोयीसुविधा, मतदार नाँदणी इत्यादीबाबत चर्चा करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे नुकतीच आढावा बैठक झाली. या बैठकीत मतदार जनजागृती कृती आराखडा तसेच जिल्हास्तरीय स्वीप समिती गठीत करण्यात आली आहे.
या बैठकीत मतदान जागरूकता वाढविण्यासाठी चर्चा केली गेली. तसेच ग्रामीण भागातील मतदार जागरूकता वाढविण्याची आवश्यकता आहे, अनेक ग्रामीण नागरिक निवडणूक प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ आहेत, म्हणून त्यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आणि माहिती सत्र आयोजित करण्याची गरज आहे, अपंग मतदारांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे दिव्यांगांसाठीही मतदान जनजागृती मोहीम आवश्यक आहे, ठाण्यातील विविध निवासी सोसायट्यांमध्ये मतदान जागृतीकरिता बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे विचार यावेळी मांडण्यात आले.
या बैठकीत स्थानिक रहिवाशांना मतदारयादी, मतदान याविषयी त्यांच्या समस्या थेट व्यक्त करण्याची संधी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मतदार यादीत आपले नाव कसे तपासावे याबद्दलही माहिती दिली गेली. अधिकार्यांनी निवडणूक कामकाजाविषयी ऑनलाईन प्सचा उपयोग कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी यावेळी सूचना देताना सांगितले की, या समितीने मतदार नोंदणी व निवडणूकीच्या वेळी प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जननागृती कार्यक्रम आयोजित करावेत. सर्व महानगरपालिका व नगरपरिषद यांच्याकरिता नेमण्यात आलेले स्वीप नोडल अधिकारी तसेच ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मतदार जनजागृती कृती आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी. या बैठकीत नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त भागवत डोईफोडे, कल्याण डोंबिविली महानगरपालिकेचे उपायुक्त संजय जाधव, कामगार उपायुक्त प्रदीप पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक ललिता दहीतुले, ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय बागूल, ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण, ठाणे सिटीझन फाऊंडेशनचे कॅस्बर ऑगस्टीन समाजसेवक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.