

Actor Prakash Bhende death
ठाणे : ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, चित्रकार प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिराचा.. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांचे बालपण भेंडे गिरगावात गेले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली.
ते टेक्स्टाईल डिझायनर झाले. त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये टेस्ट स्टाईल डिझायनर म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. चित्रपटसृष्टीत ते फार उशिरा आले. परंतु तेथे भालूसारख्या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला. भालू चित्रपटात त्यांनी आणि त्यांच्या पत्नी उमा यांनी साकारलेली नायक-नायकांची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. भालू चित्रपटाला व्यावसायिक यश लाभल्यावर त्यांनी चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची निर्मिती केली. श्रीप्रसाद चित्र या आपल्या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट निर्मिती केली.
गिरगावच्या सांस्कृतिक वातावरणात कलाकार म्हणून त्यांची जडणघडण होत गेली. चिमुकला पाहुणा, अनोळखी अशा काही चित्रपटांतून नाते जडले दोन जिवांचे या चित्रपटात त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली.
ते केवळ अभिनेते, लेखक निर्माते नव्हतेच तर ते एक उत्कृष्ट चित्रकारही होते. त्यांच्या चित्रांचे अनेक प्रदर्शने मुंबईतील विविध गॅलरीमध्ये भरवण्यात आली होती, फेस्रोक या चित्रशैलीसाठी ते प्रसिद्ध होते.