

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा वायले नगरमधील पश्चिम व्हर्टेक्स सॉलिटेअर ए 1 बहुमजली या इमारतीला मंगळवारी ( दि.26) सायंकाळी 5.48 च्या सुमारास आग लागली होती. आगीची वर्दी दक्ष रहिवासी अविनाश यांनी मोबाईलद्वारे आधारवाडी अग्निशमन केंद्रास दिली. वर्दी मिळताच अग्निशमन केंद्रातील दोन बंबांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी रवाना झाली. जागरूक रहिवाशाकडून वेळेत माहिती मिळाल्याने व्हर्टेक्स सॉलिटेअरला लागलेली आग विझविण्यात अग्निशमन आणि आणीबाणी सेवेला यश आले आहे.
सदर दुर्घटनेसंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्पष्टीकरण वजा तांत्रिक माहिती सादर केली आहे. मंगळवारी ( दि.26) रोजी सायंकाळच्या सुमारास व्हर्टेक्स सॉलिटेअर बहुमजली या इमारतीच्या ए 1 मधील 15, 16 आणि 17 व्या मजल्यावर आगीचे तांडव सुरू झाले होते. आगीची भीषणता आणि रौद्ररूप पाहता आधारवाडी अग्निशमन केंद्राचे दोन, पलावा, ड प्रभाग आणि डोंबिवली एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रांचे प्रत्येकी एक वाहन मदतीकरिता बोलविण्यात आले. तसेच उल्हासनगर, ठाणे महानगरपालिकेसह अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेचे प्रत्येकी एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वाहन मदतीकरिता घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. इमारतीमधील अग्निशमन पंप चालू करून स्थायी अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने अग्निशमन आणि विमोचन कार्य करण्यात आले. तसेच इमारतीमधील आगीच्या भक्षस्थानी अडकलेल्या 7 रहिवाशांना धुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन जवानांना यश आले. त्यातील एक वयोवृद्ध महिलेला तर पाठीवर बसून अग्निशमन दलाच्या जवानाने 16 व्या मजल्यावरून सुरक्षित खाली उतरविले सुदैवाने या आगीमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. अथक प्रयत्नांती रात्री 8.48 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दल आणि आणीबाणी सेवा यशस्वी झाले. इमारतीच्या 15, 16 आणि 17 व्या मजल्यावरील इतरत्र पसरणारी आग नियंत्रणात आणून मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान वाचविण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अतिबहुमजली इमारतींमधील स्थायी अग्निशमन यंत्रणेद्वारे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांनी लागणाऱ्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी सदर यंत्रणा उपयोगी होते. अशा यंत्रणेचा वापर कसा करावा, या संदर्भात विविध ठिकाणी, तसेच शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुले, सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्यात येते. तसेच अग्निशमन दलाच्यामार्फत प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे आहे. डोंबिवलीमध्ये देखील नव्याने अद्ययावत अग्निशमन वाहनांसह सुसज्ज अग्निशमन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे.