

ठाणे : आषाढीनंतर आता सणांची चाहुल लागली असून अवघ्या दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र घसरल्याचे दिसून येत आहेत.
अवघ्या दोन आठवड्यावर श्रावण महिना आला असल्याने बाजारात भाज्यांचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे दैनंदिन बजेटवर परिणाम झाला आहे. त्यातच सततचा पाऊस आणि त्यामुळे भाज्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आवक घटल्याने भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत तर कोथिंबीरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे बर्याच गृहिणी बाजारात गेल्यानंतर आवर्जून कोथिंबीर घेत आहेत आणि पावसाळ्यात चहा सोबत गरमागरम कोथिंबीर भजी, कोथिंबीर वड्या करायला पसंती देत आहेत.
दरम्यान हे वाढलेले दर पाहता श्रावण महिना संपेपर्यंत म्हणजेच किमान एक ते दीड महिना तरी दरवाढीची ही स्थिती अशीच राहील असा अंदाज भाजी विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला की या दरम्यान येणार्या रानभाज्या अजून तरी पाहिजे तशा बाजारात दाखल झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक नागरिक दैनंदिन भाज्यांचा सर्रास वापर करत आहेत. त्यातच पाऊस सुरू झाला असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे.
साहजिकच हे नुकसान होत असल्याने भाज्यांची मागणी तीच मात्र पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे वाढते दर पाहता गृहिणींच्या नियमितच्या बजेटवर परिणाम झाला असल्याचे भाजी विक्रेते सांगत आहेत.
भाज्यांचे दहा किलोमागे घाऊक दर
टोमॅटो 250 रुपये, फ्लॉवर 300 रुपये, कोबी 180 रुपये, मिरची 500 रुपये, दुधी 200 रुपये, शेवगा 600 रुपये, शिमला 800 रुपये, आलं 300 रुपये, तोंडली 300 रुपये, शिराळे 500 रुपये, कारले 500 रुपये, वांगी 300 रुपये, गवार 650 रुपये
भाज्यांचे एक किलोमागे किरकोळ दर
टोमॅटो 40 रुपये, फ्लॉवर 120 रुपये, कोबी 50 रुपये, मिरची 80 रुपये, दुधी 60 रुपये, शेवगा 120 रुपये, शिमला 120 रुपये, आलं 80 रुपये, तोंडली 120 रुपये, शिराळे 120 रुपये, कारले 120 रुपये, वांगी 80 रुपये, गवार 120 रुपये
पावसाळा सुरू झाला की, बाजारात रानभाज्या येतात, मात्र अजून तरी हव्या तशा या भाज्या आल्या नसल्याने दररोज बाजारात उपलब्ध असणार्या भाज्यांकडे आमचा कल आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे आमचे बजेट कोलमडले आहे. परंतु कोथिंबीर स्वस्त असल्याने अधिकची कोथिंबीर घेऊन भर पावसात गरमागरम चहासोबत कोंथिबीर वडी किंवा कोथिंबीर भजी करण्याला आम्ही पसंती देत आहोत.
नीलम म्हात्रे, गृहिणी