

शाम धुमाळ
कसारा : मध्य रेल्वेच्या वासिंद ते आसनगाव स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील एका मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारी सुमारे तासभर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला. अखेर रेल्वे प्रशासनाने खर्डी स्थानकावरून पर्यायी इंजिन मागवल्यानंतर सुमारे तासाभराने रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात यश आले.
रविवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास वासिंद ते आसनगाव स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन अचानक निकामी झाले. त्यामुळे आसनगाव आणि कसारा दिशेने धावणाऱ्या लोकल व एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अनपेक्षित घटनेमुळे अनेक गाड्या विविध स्थानकांवर आणि मार्गातच उभ्या राहिल्या. आधीच उकाडा असताना गाड्या एकाच जागी थांबल्याने प्रवाशांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागला. अखेर खर्डी स्थानकावरून पर्यायी इंजिन आणून मालगाडी मार्गस्थ करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.
टिटवाळा ते कसारा या दरम्यानच्या रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेतील बिघाड, इंजिन निकामी होणे, किंवा ओव्हरहेड वायर (OHE) तुटण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या देखभालीच्या यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वासिंद ते कसारा या दुर्गम आणि घाट विभागाच्या टप्प्यात अशा घटना वारंवार घडत असूनही रेल्वे प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे उमेश विशे यांनी केला. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी टिटवाळा ते कसारा दरम्यानच्या प्रत्येक प्रमुख स्थानकावर पर्यायी इंजिन (बॅकअप इंजिन) तैनात ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.