Vasai News | सुरतहून अचानक ट्रेन परस्पर वळविली : वेलंकनीला जाऊ इच्छिणाऱ्या वसईतील हजारो प्रवाशांना मनस्ताप!

प्रवाश्यांचा ठिय्या आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेकडून पर्यायी ट्रेनची व्यवस्था
Vasai News | सुरतहून अचानक ट्रेन परस्पर वळविली : वेलंकनीला जाऊ इच्छिणाऱ्या वसईतील हजारो प्रवाशांना मनस्ताप!
Published on
Updated on

वसई: वसईतून पुढे कल्याण व पुणे मार्गे तामिळनाडूत वेलंकनीला जाणारी गाडी सुरतपूर्वी सोलापूरमार्गे वळवल्यामुळे संतप्त प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकात गुरुवारी रात्री ठिय्या मांडला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानक ट्रेन वसईत येणार नसल्याचे समजताच दोन दोन महिने आधी आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला.

वसईरोड रेल्वे स्थानकात मध्यरात्री हजारो प्रवाशांनी संतप्तपणे निदर्शने करीत पर्यायी ट्रेनची मागणी लावून धरली. समाज माध्यमातून ही घटना प्रचंड व्हायरल झाली. पालघरचे आजी-माजी खासदार आणि वसई, नालासोपाराचे आजी-माजी आमदार यांनीही प्रवाशांची बाजू जोरदार रेटून धरल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाकडून मध्यरात्री पर्यायी विशेष ट्रेनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील ख्रिस्ती भाविकांचे एक प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या वेलंकनीतील मरिया मातेच्या नोव्हेनासाठी दरवर्षी लाखो भाविक तामिळनाडूत दाखल होतात. यात वसईतील ख्रिस्ती बांधवांचाही मोठया प्रमाणात समावेश असतो. तर सध्या मासेमारी बंदीचा काळ सुरू असल्याने वसईतील सामान्य ख्रिस्तजन आणि ख्रिस्ती कोळी बांधवांनी दोन महिन्यांपूर्वी वेलंकनीला जाण्याची तिकिटे आरक्षित केली होती. गुरुवारी वसईतून संध्याकाळी ४ वाजता सुटणारी अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस पकडण्यासाठी उत्तन, भाईंदर, वसई, पाचूबंदर -कोळीवाडा, अर्नाळा अशा विविध भागातील हजारो भाविक, प्रवासी सकाळी ११ वाजल्यापासून वसई रेल्वे स्थानकात येऊन थांबले होते.

मात्र, लोणावळा येथे रुळावर दरड कोसळल्यामुळे ही एक्सप्रेस अचानक सुरतपूर्वीच सोलापूरमार्गे वळवली असल्याची माहिती वसईतील प्रवाशांना आयत्यावेळी देण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थेची मागणी करत वसईरोड स्थानकात ९ ते १० तास ठिय्या मांडला होता. अखेर प्रवाशांची मागणी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे रेल्वे प्रशासनाने यात्रेकरूंसाठी रात्री तीन वाजता वसई रेल्वे स्थानक ते दौंडपर्यंत विशेष गाडी उपलब्ध करून दिली आहे. याप्रकरणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विशेष भूमिका पार पाडली.

त्यानंतर विशेष गाडी दौंड येथे पोहोचल्यावर वसईतील सर्व प्रवाशांना सोलापूरमार्गे वळवण्यात आलेल्या अहमदाबाद जंक्शन–तिरुचिरापल्ली एक्स्प्रेस बसविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पालघरचे आजी-माजी खासदार आणि वसई, नालासोपाराचे आजी-माजी आमदार यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे सर्व प्रवाशांनी आभार मानले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news