

विरार : वसई-विरार शहर महापालिकेने कामण परिसरात धडक कारवाई करत दोन बनावट डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित व्यक्तींनी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहीम राबवली. कामण परिसरात क्लिनिक चालवणारे सुनील कुमार यादव आणि चिंचोटी भागातील लिटन मृत्युंजय विश्वास हे दोघे संबंधित कारवाईत दोषी आढळले. यांच्याकडे डॉक्टरकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही पदवी अथवा परवाना नसल्याचे समोर आले असून, ते स्वत:ला डॉक्टर म्हणवून विविध आजारांवर उपचार करत होते.
तपासणीदरम्यान दोघांकडे आढळलेल्या औषधांचा साठा, तपासणी उपकरणे आणि औषधांचा वापर हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय केला जात असल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वसई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महापालिकेने या कारवाईसाठी विशेष पथक तयार करून बनावट डॉक्टरांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या अशा प्रकारच्या अवैध डॉक्टरांविरोधात प्रशासनाने जी भूमिका घेतली आहे, ती स्वागतार्ह ठरत आहे. महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले की, शहरात अशा प्रकारे वैद्यकीय सेवा देणार्यांवर लक्ष ठेवले जात असून, भविष्यातही अशाच कारवाया सुरू राहतील. नागरिकांनी अशा व्यक्तींबाबत माहिती मिळताच त्वरित महापालिकेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.