

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या आयोध्या नगरीतील प्रियदर्शनी बिल्डिंगमध्ये राहणारे ज्येष्ठ साहित्यिक तथा संगितज्ज्ञ वामनराव देशपांडे यांचे मंगळवारी (दि.10) रोजी सकाळी निधन झाले.
ज्येष्ठ साहित्यिक तथा संगितज्ज्ञ वामनराव देशपांडे यांचे मृत्यू समयी ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नोकरी निमित्त हैदराबाद येथे स्थायिक असलेला मुलगा आल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
वामनराव देशपांडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील अरिंदम रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. वामनराव देशपांडे यांचे मंगळवारी (दि.10) रोजी सकाळी रूग्णालयात निधन झाले. देशपांडे यांनी कविता, कादंबरी, लेख, त्याचबरोबर धार्मिक विषयावरील प्रदीर्घ लेखन केले. मसापच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले. त्यांची सुमारे १२५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर वामनराव डोंबिवलीतील अयोध्या नगरी येथे वास्तव्यास आले.
वामनराव देशपांडे हे मराठी लेखक, समीक्षक, कवी आणि संगीतज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. विविध साहित्य संमेलनांमध्ये ते सक्रिय असत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, ज्यात कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीत आणि भक्तिगीतांचा समावेश आहे. वामनरावांचा जन्म यवतमाळ येथे झाला. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीत, भक्तिगीत, संत साहित्य, आदी विविध विषयांवर लेखन केले आहे. ते संगीत समीक्षक आणि संगीतज्ञ म्हणूनही ओळखले जात असत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी मुलांसाठी संत तुकाराम आणि इतर विषयांवर लेखन केले आहे. त्यांनी सार्थ श्रीज्ञानेश्वरी या ग्रंथाचे भाषांतर केले. वामनरावांच्या पार्थिवावर शिवमंदिर मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी साहित्यिक, संगीत, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.