

बदलापूर : सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेल्या पावाचे दर येत्या 24 डिसेंबरपासून वाढत आहेत. 3 रुपये दरवाढ वाढवण्याचा निर्णय कुळगांव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोशिएशनतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती पदाधिकारी आयुब गडकरी यांनी दिली. येत्या 24 डिसेंबरपासून ही नवीन भाववाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे 24 ऑगस्टपासून एका लादीसाठी (आठ पाव) 23 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर 20 रुपये इतका होता. लादीपावाचे दर वाढल्याने वडा पावचे दर देखील वाढणार असल्याने सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसणार आहे.
बदलापुरातील बेकरी मालकांनी संघटना असलेल्या कुळगांव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोशिएशनची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव उजेर मुल्ला यांनी दिली. वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरल्यामुळे महागाई वाढत चालली असून या निषेधार्थ कुळगांव बदलापूर बेकरी ओनर्स असोसिएशनच्या वतीने ही भाव वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पाव, खारी, बटर, टोस्ट अशा बेकरी उत्पादनांसाठी लागणार्या तेल तूप, साखर, मैदा अशा वस्तूंच्या किमतीमध्ये तसेच भट्टीसाठी लागणार्या लाकडाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बेकरी उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर बेकरी ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. तर खारी, बटर व टोस्टच्या किमतीत पाव किलोमागे 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बेकरी उत्पादनांसाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. बदलापुरात एकूण 20 बेकर्या असून यामध्ये दिवसाला सहा हजाराहून लादी पाव तयार केले जातात. तीन वर्षांपूर्वी 2021 नोव्हेंबरमध्ये हे दर दोन रुपयांनी वाढवण्यात आले होते.
वाढतीमहागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा निषेधार्थ बदलापूरातील सर्व बेकरी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व बेकरी चालक सहभागी होणार असून या दिवशी बदलापुरात कोणालाही पाव आणि बेकरी उत्पादने मिळणार नाहीत. त्यामुळे वडापाव, मिसळ पाव व तत्सम पदार्थ बदलापूरकरांना उपलब्ध होणार नाहीत.