Uttan Virar Sea Link : उत्तन-विरार सी-लिंकच्या भूसंपादनाला ग्रामस्थांचा विरोध

सी-लिंक किनाऱ्यालगत उभारण्यात येणार असल्याने मासेमारीसाठी ठरणार अडचणीचा
Uttan Virar Sea Link
Uttan Virar Sea Link pudhari photo
Published on
Updated on

भाईंदर : राजू काळे

वरळी व वर्सोवा सी लिंकला जोडणारा उत्तन-विरार सी-लिंकसाठी उत्तन व डोंगरी गावातील सुमारे १०४.२८५१ हेक्टर जमीन सक्तीने संपादीत करण्यात येणार असल्याचा आरोप करीत उत्तन व डोंगरीतील ६१६ जमीन मालकानी या सी लिंकला तीव्र विरोध दर्शविला आहे. तर हा सी-लिंक किनाऱ्यालगत उभारण्यात येणार असल्याने तो मासेमारीसाठी अडचणीचा ठरणार असल्याने त्याविरोधात स्थानिक मच्छिमार देखील एकवटले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरासोबत सागरी वाहतुकीला गती देण्यासाठी राज्य शासनाने मुंबई-वाढवण सी लिंकचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तन–विरार सी-लिंक (टप्पा क्रमांक १) वरळी, वर्सोवा सी-लिंकला जोडण्यात येणार आहे. विरारहून हा सी-लिंक डहाणू येथे प्रस्तावित करण्यात आला आहे.

उत्तन-विरार सी-लिंक प्रकल्पांतर्गत एकूण ५५.१२ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू प्रस्तावित असून त्यात २४.३५ किलोमीटरचा मुख्य सी-लिंक व ३०.७७ किलोमीटरचे तीन अंतर्गत बदल दर्शविण्यात आले आहेत. त्यात उत्तन येथील ज्यूडिशियल अकॅडमी, केशवश्रुष्टि व डोंगरी अंतर्गत ९.३२ किलोमीटरचा बदल तसेच वसई २.५ किलोमीटर आणि विरार १८.९५ किलोमीटरचा अंतर्गत बदल दर्शविण्यात आला आहे.

Uttan Virar Sea Link
Bhayandar Ghodbunder Road Project: गायमुख ते भाईंदर प्रवास होणार सुपरफास्ट

भाईंदरच्या दिशेने ज्युडिशियल अकॅडमी, केशवश्रुष्टी व डोंगरी येथे प्रस्तावित जोडरस्त्यात सुमारे १०४.२८५१ हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. या क्षेत्राच्या भूसंपादनासाठी एमएमआरडीएने हजारो पानांचा आराखडा तयार केला असून २६ जून २०२६ रोजी त्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेत बाधित क्षेत्रातील आवश्यक जमिनीचे भुसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापन करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार सक्तीचे भूसंपादन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

बाधित जमिनीपोटी जमीन मालकांना आर्थिक मोबदला किंवा बाधित क्षेत्राच्या प्रमाणात चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अथवा विकास हक्क हस्तांतरण (टिडीआर) देण्यात येणार आहे. यानुसार एमएमआरडीएने बाधित जागेच्या ६१६ मालकांना नोटिसा बजाविल्या असून त्याच्या संमतीसाठी १५ दिवसांची मुदत अधिसूचनेत देण्यात आली होती. त्यावर ग्रामस्थांनी कोणतीही संमती न देता अधिसूचनेवर हरकती घेतल्या आहेत. एमएमआरडीएने जमीन मालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच विश्वासात न घेता परस्पर अधिसूचना जाहीर करीत बाधित जमिनीच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी जागा मालकांची संमती अपेक्षिल्याने त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

वर्सोवा-उत्तन सी लिंकला गोराई मार्गावरील ज्युडिशियल अकॅडमी व केशवश्रुष्टी येथे उतार देण्यात येणार असून हा जोडरस्ता केवळ व्हीआयपी व्यक्तीखेरीज सामान्यांसाठी प्रतिबंधित असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याव्यतिरीक्त डोंगरी येथील उत्तन सागरी पोलीस चेकपोस्ट जवळ तिसरा जोडरस्ता तयार केला जाणार आहे. हा जोडरस्ता सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उत्तनकरांना जवळच्या केशवसृष्टी व ज्युडिशियल अकॅडमी येथील जोडरस्त्याऐवजी डोंगरी येथील जोडरस्त्यावरून सी लिंकवर जावे लागणार आहे.

Uttan Virar Sea Link
One Ward, One Garden : शहरात आता एक प्रभाग-एक उद्यान संकल्पना राबविणार

हे अंतर सुमारे ५ किमी इतके असल्याने हा सी लिंक उत्तनकरांसाठी फायद्याचा नसल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार नेते बर्नड डिमेलो यांनी केला आहे. तसेच वर्सोवा ते उत्तन सी लिंक पुढे वसई, विरारच्या दिशेने जाणार असून तो उत्तन किनाऱ्यापासून सुमारे १ किमी अंतरावर उभारण्यात येणार आहे. यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना हा सी लिंक अडसर ठरणार असून तो किनाऱ्यापासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या वाशी खडकाच्या मागून विरारच्या दिशेने उभारण्यात यावा, अशी मागणी बर्नड यांनी केली आहे. यामुळे एमएमआरडीएने नियोजित सी लिंकचा तयार केलेला आराखडा मच्छिमारांचा मासेमारी व्यवसाय उध्वस्त करणारा असून त्याला मच्छिमारांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news