

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफचा गणवेश परिधान करून प्रवाशांवर रूबाब मारणारा उस्मानाबादचा पठ्ठ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या हाती लागला आहे. चौकशी दरम्यान हा पठ्ठ्या तोतया असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा नोंदवून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अविनाश राजाराम जाधव (२५) असे तोतया जवानाचे नाव असून तो उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील इडा गावचा रहिवासी आहे.
आरोपी अविनाश जाधव हा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा गणवेश परिधान करून कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी मध्यरात्री गस्त घालत होता. रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेले जवान एकमेकांना परिचित आहेत. बुधवारी संध्याकाळी सात ते पहाटे तीनच्या दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक रमेशसिंह यादव कल्याण रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान रमेशसिंह यादव यांना खाकी गणवेश परिधान केलेला एक तरूण फलाटावर गस्त घालताना आढळून आला.
फलाटावर दिवस-रात्र कोण गस्त घालत असते याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना असते. त्यामुळे फलाटावर अचानक हा खाकी गणवेशातील आरपीएफ जवान आला कुठून ? असा प्रश्न सहाय्यक उपनिरीक्षक रमेशसिंह यादव यांना पडला. रमेशसिंह यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. कोणत्या विभागातील आरपीएफ जवान आहात ? अशी विचारणा केल्यावर स्वतःचे नाव अविनाश राजाराम जाधव असल्याचे सांगणाऱ्याने आपण पुणे रेल्वे स्थानक भागात कर्तव्यावर असतो, अशी थाप मारली. शिवाय वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पथकासह गस्तीवर असल्याचे सांगून आपण याठिकाणी आलो आहोत. सद्या आपले गस्ती पथक स्कायवाॅकवर आहे, असेही त्याने सहाय्यक उपनिरीक्षक रमेशसिंह यांना सांगितले.
रमेशसिंह यांना त्याच्या बोलण्यावरून संशय आला. त्यासाठी रमेशसिंह यांनी त्याला घेऊन त्याचे पथक पाहण्यासाठी स्कायवाॅकवर गेले. तेव्हा त्यांना आरपीएफ जवान आढळले नाहीत. यावर रमेशसिंह यांंचा संशय बळावला. तोतयाला तेथेच थांबवून घडल्या प्रकाराची ही माहिती वरिष्ठ निरीक्षक रणजित सिंह यांना दिल्यानंतर तेही तात्काळ पथकासह घटनास्थळी आले. अधिक चौकशीसाठी या तोतयाला आरपीएफ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपले आता बिंग फुटले आहे. आपली काही धडगत नाही. असा विचार करून या तोतयाने पळ काढला. मात्र जवान मंगेश थेरे, रितेश त्रिपाठी आणि नीळकंठ गोरे यांंनी पाठलाग करून त्याला फर्लांगभर अंतरावर पकडले.
या तोतयाकडून रेल्वे सुरक्षा बलाचा जवान असल्याचे भासवून प्रवाशांची लुटमार करण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याचा ताबा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिला. पोलिसांनी अविनाश जाधव या तोतयाच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. हे सर्व करण्यामागची कारणे काय असू शकतात ? याचा उलगडा करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद जगताप चौकस तपास करत आहेत. कुणाला संशय येणार नाही अशा पध्दतीने अविनाश जाधव याने आरपीएफ जवानाचा गणवेश परिधान केला होता. त्याच्याकडून गणवेशासह आरपीएफचा मोनोग्राम, स्टार, नेमप्लेट, टोपी, पट्टा, बूट, फायबरची काठी हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.