

अमली पदार्थांचा विळखा देशाचे नुकसान करत आहे. तरूण पिढीच त्यामुळे उद्ध्वस्त होत असून आता या गुन्हेगारांनी महाविद्यालयीनच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळतोय हे अधोगतीचे द्योतक मानले जाते. सुरूवातील मुलांना हुंगण्यासाठी पावडर आणि पाण्यातून नशेच्या गोळ्या दिल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने याच मुलांचे व्यसन पराकोटीला जाते. व्यसनाधीन झालेल्या मुलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत वाईट अवस्था होते. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी जागरूक होऊन एकत्रितपणे त्याविरोधात लढा उभारला पाहिजे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार रेल्वे, रस्ते, कुरीअर, तसेच परदेशातून कंटेनरद्वारे महामुंबई परिसरात ड्रग्जची तस्करी होत असून, ऑनलाईनच्या माध्यमातून देखिल ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. परिणामी तस्करांसह नशेखोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तरूणांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महामुंबईसह नवी मुंबई, ठाणे पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दी ड्रग्जच्या विळख्यात सापडल्या आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी असंख्य कारवाया करत तस्करांना जेरबंद केले आहे. तरीही ड्रग्ज तस्करीवर अंकुश आलेला नसल्याची गंभीर स्थिती आहे. ड्रग्ज तस्करीचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. विविध शहरांमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरसह वसई-विरार आदी शहरे याला अपवाद नाहीत. मुळात ड्रग्ज पकडल्यानंतर मुख्य सूत्रधारांचा शोध लागत नाही.
परिणामी शहरांमध्ये ड्रग्जचा येणारा ओघ चालूच राहतो. ड्रग्जच्या तस्करीसाठी नानाविध मार्गाचा अवलंब केला जात असल्याने याची अनेकदा पोलिसांना साधी कुणकुणही लागत नाही. ड्रग्ज तस्कर तरूणाईला आपल्या जाळ्यात ओढत त्यांना ड्रग्जचा पुरवठा करतात. नशा करता-करता हेच तरूण ड्रग्ज तस्करीमध्ये उतरतात. विशेष गंभीर बाब म्हणजे परराज्यातून तसेच परदेशातूनही ड्रग्जची तस्करी होत असते. अत्यंत महत्त्वाचे बंदर असलेल्या जेएनपीटीला ये-जा करण्याचा मार्ग महामुंबईतूनच जात असल्याने याचाही फायदा तस्कर घेत असल्याचे बोलले जात आहे.
तरूणांना अमली पदार्थाचा विळखा...अमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक...रेल्वे फूटपाथवर चालतो अमली पदार्थाचा धंदा...अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू...आलिशान लोकवस्ती असलेल्या परिसरातील फ्लॅटमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले...दोघा-चौघांना अटक...अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो आणि न्यूज चॅनेलवर पाहतो, ऐकतो आणि सोडून देतो. आजची बहुसंख्य तरूण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. भारताच्या हद्दीत अमली पदार्थांची तस्करी करणार्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. तरूणांना यापासून रोखण्याची समस्या पालकांना सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
भावी तरूण पिढीला वाचविण्यासाठी शासनच सरसावले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या 17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे.
उडता पंजाब या चित्रपटात पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचे दाखविले आहे. याचा अर्थ आपल्या शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान देशातून अमली पदार्थ भारतात छुप्या मार्गाने येतात. याची किंमतही लाखो रूपयांच्या घरात असते. याची खरेदी-विक्रीही सांकेतिक चिन्हे, खुना व भाषांच्या माध्यमातून होते. हशीश नावाचा अंमली पदार्थ नेपाळमधून पुरविला जातो. नायजेरियनांकडून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते. नायजेरिया देशातील नागरिक किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वावरताना दिसतात.
ज्या पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते, त्याला रूढार्थाने मादक किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन अर्थात गर्द इत्यादी पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, अल्कोहोल, नेल पॉलिश रिमूव्हर किंवा विशिष्ट शाई काढण्याचे द्रावण (ink remover), बाम रूमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे याचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.