

उल्हासनगर : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी टीम ओमी कलानीचे उमेदवार हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे 35 आणि कलानीचे 32 असे एकूण 67 उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत मोठे राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणुकीपूर्वीच शिवसेना (साई पक्ष) आणि टीम ओमी कलानी यांच्यात दोस्तीचे गटबंधन झाले असून यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी रिजेन्सी हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेला 35, टीम ओमी कलानीला 32 आणि साई पक्षाला 11 जागा या प्रमाणात वाटप निश्चित झाले.
दरम्यान, सोमवारी सकाळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी शिवसेनेबरोबर युती होणार नसल्याची घोषणा केली. या घडामोडीनंतर तिन्ही पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी ए बी फॉर्मशिवायच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सायंकाळी भाजपच्या नगरसेवकांना ए बी फॉर्म देण्यात आले आहेत. तर शिवसेना आणि टीम ओमी कलानीचे उमेदवारांना मंगळवारी सकाळी ए बी फॉर्म मिळणार आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी दुपारी 3 वाजे पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची भाऊ गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
सायंकाळी उशिरा टीम ओमी कलानी गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली. कलानी समर्थक नगरसेवक पदाचे उमेदवार हे ‘शिवसेनेच्या धनुष्यबाण’ या निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला ओमी कलानी, जमनू पुरस्वानी, पंचम कलानी, प्रकाश मखिजा, सुमित चक्रवर्ती, कमलेश निकम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे तिकीट वाटप पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी त्यांचे तिकीट वाटप पूर्ण केले आहे. या तिकीट वाटपात काँग्रेसला 19, मनसेला 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 48 जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप देखील करण्यात आले.