Ulhasnagar snakebite | विषारी साप चावल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप!

मध्यवर्तीच्या डॉक्टरांनी उपचारासाठी सापाचा फोटो मागितल्याचा नातेवाईकांचा आरोप, डॉक्टरांनी मात्र आरोप फेटाळले, वेळेत उपचार केल्याचा दावा
मृत बालक सुलतान शेख
मृत बालक सुलतान शेख
Published on
Updated on

उल्हासनगर : अंबरनाथ पूर्वेतील शिवमंदिर-कैलाश कॉलनी परिसरात विषारी साप चावल्याने अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी सापाचा फोटो मागत उपचार करण्यास विलंब केल्याचा गंभीर आरोप मृत बालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत वेळेत उपचार केल्याचा दावा केला आहे.   

     मिळालेल्या माहितीनुसार, शिवगंगा परिसरातील रस्त्यालगतच्या वस्तीत राहणारा सुलतान शेख (वय ३) हा आपल्या घरात खेळत होता. यावेळी घराजवळील झाडाझुडपांतून आलेल्या एका विषारी सापाने त्याच्या कमरेजवळ दंश केल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला सुलतान खेळत असल्याने ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र काही वेळातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि प्रकृती झपाट्याने खालावू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.   

   सुलतानच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी साप चावल्याचा दावा असल्यास त्या सापाचा फोटो दाखविण्याची मागणी केली. त्यामुळे उपचार सुरू होण्यास विलंब झाला आणि त्याचा फटका सुलतानला बसला. “साप दंश करून बिळात निघून गेला असताना त्याचा फोटो कुठून आणायचा ? सापाचा फोटो मागण्याऐवजी तातडीने उपचार केले असते तर आमचा मुलगा वाचला असता,” अशी भावना व्यक्त करत कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात आक्रोश केला.     

    एकुलत्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. आपल्या लेकराला गमावल्याच्या वेदनेने कुटुंबीयांनी टाहो फोडत डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला. दरम्यान, शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्ण दाखल होताच आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते आणि कोणत्याही प्रकारचा विलंब झाला नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यामुळे नेमके सत्य काय, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news