

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक नेमणुकीत भाजपने शिफारस केलेल्या चार सदस्यांपैकी दोन सदस्य बाद झाल्याने त्यांच्या ठिकाणी शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांनी समाजसेवक म्हणून अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या हेमा पिंजानी आणि आशा पवार यांची नेमणूक केली. यामुळे चिडलेले भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव येणार असल्याचे जाहीर केले.
उल्हासनगर महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक निवडणुकीचे नामनिर्देश पत्र दाखल करण्याची प्रक्रिया मागील महिनाभरापासून सुरू आहे. महानगरपालिकेने 24 सप्टेंबर रोजी निवडणुका जाहीर केल्यावर 22 तारखेला नामनिर्देशपत्र दाखल करण्याची प्रक्रिया हाताळली गेली. त्यामध्ये भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 21 नामनिर्देश पत्र दाखल झाले होते. निवडणुकीच्या दिवशी महापौर अश्विनी निकम यांनी महासभा स्थगित केली.
या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा महानगरपालिका गटनेते राजेश वधारिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने 25 सप्टेंबरच्या आत स्विकृत नगरसेवकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 28 सप्टेंबर पर्यंत प्रथम पद रद्द करण्यात आलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश मुबंई उच्च न्यायालयाला दिले होते.
संपूर्ण प्रक्रिये अंती सोमवारी स्वीकृत नगरसेवकांची महापालिकेत नेमणूक जाहीर करण्यासाठी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या वादळी झालेल्या महासभेत भाजपकडून नामनिर्देशित केलेल्या चार सदस्यांपैकी प्रदीप रामचंदानी आणि कपिल अडसूळ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्याऐवजी डॉक्टर एस.बी.सिंग आणि वकील पुनम गुप्ता यांची नेमणूक करण्याबाबतचे शिफारस पत्र भाजप गटनेते राजेश वधारिया यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्या आधारावर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महापौर अश्विनी निकम यांना सात नामनिदर्शित सदस्यांची शिफारस केली होती.
या शिफारशी मध्ये भाजपकडून धनंजय बोडारे , राजेंद्र श्रीखंडे, डॉक्टर एस. बी. सिंग आणि पुनम गुप्ता तर शिवसेनेकडून पंचम कलानी, रमेश चव्हाण आणि निलेश बोबडे त्यांची नावे नमूद होती. मात्र शिवसेना नेते जमानदास पुरस्वानी यांनी डॉ. एस.बी. सिंग आणि पुनम गुप्ता यांना भाजपने अर्ज भरताना शिफारस दिली नसल्याची बाब समोर आणली. त्याचा आधार घेत या दोन जणांच्या ऐवजी समाजसेवा करणारे आशा पवार आणि हेमा पिंजानी या दोघांच्या नावाची घोषणा महापौर अश्विनी निकम यांनी केली. तर शिवसेनेकडून पंचम कलानी, रमेश चव्हाण आणि निलेश बोबडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.