

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता उघड राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपने महापालिकेतील शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणण्याची तसेच सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काम न करण्याची भूमिकाही भाजपने जाहीर केली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष व महापालिकेतील गटनेते राजेश वधारिया आणि आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे नगरसेवक धनंजय बोडारे, विपुल मयेकर, राजू गोपलानी, सोहना जेस्वानी, अर्चना करणकाळे, नान्सी उदासी, भावना ओवळेकर, प्रशांत पाटील, अजित सिंग लबाना आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हासनगर महापालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीमध्ये पक्षीय संख्याबळानुसार भाजपला चार आणि शिवसेनेला तीन जागा मिळणे अपेक्षित असल्याचा भाजपचा दावा होता. मात्र, भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांची आणि भाजपच्या दोन उमेदवारांची निवड जाहीर केली. त्यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
या निर्णयाविरोधात भाजपने न्यायालयीन लढाईचा इशाराही यापूर्वीच दिला आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या प्रक्रियेवरून यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेले होते. पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी महापौर अश्विनी निकम यांच्या पती कमलेश निकम आणि सभागृह नेता यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीमध्ये शिवसेनेने भाजपसोबत झालेल्या राजकीय समझोत्याचे पालन केले नसल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतील घडामोडींमुळे आधीपासूनच तणावात असलेल्या भाजप-शिवसेना संबंधांना आता उघड तडा गेला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेतील सत्तेची समीकरणे तसेच आगामी स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्वीकृत नगरसेवकाच्या नेमणुकीत शिवसेनेची खेळी भाजपच्या जिव्हारी
उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या यांच्या शिफारशी मध्ये भाजपकडून धनंजय बोडारे , राजेंद्र श्रीखंडे, डॉक्टर एस. बी. सिंग आणि पुनम गुप्ता तर शिवसेनेकडून पंचम कलानी, रमेश चव्हाण आणि निलेश बोबडे त्यांची नावे नमूद होती. मात्र शिवसेना नेते जमनादास पुरस्वानी यांनी डॉ. एस.बी. सिंग आणि पुनम गुप्ता यांना भाजपने अर्ज भरताना शिफारस दिली नसल्याची बाब समोर आणली. त्याचा आधार घेत या दोन जणांच्या ऐवजी समाजसेवा करणारे आशा पवार आणि हेमा पिंजानी या दोघांच्या नावाची घोषणा महापौर अश्विनी निकम यांनी केली. तर शिवसेनेकडून पंचम कलानी, रमेश चव्हाण आणि निलेश बोबडे यांची शिफारशीनुसार नेमणूक करण्यात आली. मात्र तत्पूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले प्रदीप रामचंदानी यांच्यासह कपिल अडसूळ याचा उमेदवारी अर्ज शिवसेना नेत्यांच्या आदेशावरून पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी बाद केल्याचा आरोप करण्यात आला.