

उल्हासनगर : अघोरी विद्या, पैशांचा पाऊस आणि घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर येथून समोर आला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात बाब्बू गुरु, पम्मी गुरु, गणेश पवार, गीता जाधव यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये गीता जाधव हिच्यामार्फत तक्रारदार महिलेची बाब्बू गुरु यांच्याशी ओळख झाली होती. घरातील धार्मिक विधी आणि तब्येतीच्या समस्येचा संदर्भ देत 'घरात विशेष पूजा केल्यास त्रास दूर होईल, तसेच घरात गाडलेले धन मिळू शकेल', असे बाब्बू गुरु यांनी सांगितल्याचा आरोप आहे. यानंतर ४ जानेवारी २०२६ रोजी बाब्बू गुरु आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी महिलेच्या घरी पूजा केली. या पूजेसाठी तक्रारदार महिलेकडून ४ लाख रुपये रोख आणि सुमारे ६ तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय पूजा साहित्याच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
५ जानेवारी रोजी पुन्हा काही जण महिलेच्या घरी आले. त्यांनी घरातील खंडोबा देवस्थानाजवळ जमिनीत पूजा साहित्य पुरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर घरात पुरलेल्या वस्तू बाहेर काढल्यास कुटुंबातील व्यक्तीला धोका निर्माण होईल, अशी भीती दाखवून महिलेला धमकावण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचे काही चित्रीकरण महिलेच्या घरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पैसे आणि सोन्याचे दागिने वारंवार मागूनही संबंधितांनी ते परत केले नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. दरम्यान, ३१ जुलै २०२६ रोजी गणेश पवार हा महिलेच्या घरी आला आणि त्याने जमिनीत पुरलेल्या वस्तूंपैकी इतर वस्तू न काढता केवळ तांब्याचे भांडे सोबत नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.