Ulhasnagar Crime: ऐन निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात दोन गावठी कट्टे जप्त
उल्हासनगर : ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत विठ्ठलवाडी व मध्यवर्ती पोलिसांनी दोघांना दोन गावठी कट्ट्यासह अटक केली. या घटनांमुळे निवडणुकीदरम्यान घातपाताची शक्यता तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पहिली कारवाई कॅम्प 4 येथील सुभाष टेकडी परिसरात करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत सर्टिफाईड स्कूलच्या मैदानात एक संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सोनू प्रकाश ठाकूर असे असून तो शहाड फाटक परिसरात राहत आहे. त्याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सी-ब्लॉक रोडवरील सेंचुरी मैदान परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांनी सापळा रचून एका संशयितास अटक केली. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस सापडले. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव मोहम्मद फारूक हरून अन्सारी असून तो भिवंडी येथे राहणारा आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

