Ulhasnagar Crime : उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई! २४ लाखांची खंडणी मागणा-या वसार गावच्या हेमंत वायलेसह तिघे गजाआड

Ulhasnagar Crime : उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई! २४ लाखांची खंडणी मागणा-या वसार गावच्या हेमंत वायलेसह तिघे गजाआड
Published on
Updated on

उल्हासनगर : पिंपरी-चिंचवड येथील संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका युवकाचे अपहरण करून, त्याच्या सुटकेसाठी २४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर जवळील वसार परिसरातील हेमंत वायले याच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, १८ व १९ जूनच्या मध्यरात्री काही आरोपी जबरदस्तीने एका फ्लॅटमध्ये घुसले आणि त्यांनी युवकाला पळवून नेले. त्यानंतर आरोपींनी संबंधित युवकाच्या मोबाईलवरूनच त्याच्या कुटुंबीयांना व मित्रांना फोन केला आणि सुटकेसाठी २४ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास युवकाला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

प्राथमिक तपासात आरोपी हे अवैध सावकारी व जास्त व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि व्याजाच्या पैशांच्या वादातूनच हे अपहरण घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपहृत युवकाला दोन दिवस एका बंद खोलीत डांबून ठेवून, त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संत तुकारामनगर पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेने संयुक्त तपास सुरू केला. पोलीस शिपाई बाबू जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा आरोपींपैकी तिघांना बेड्या ठोकल्या.

या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी, हेड कॉन्स्टेबल सतीश साबकाळे, सुरेश जाधव, पोलीस शिपाई बाबू जाधव व नितीन बैसाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस आता अपहृत युवकाची सुरक्षित सुटका, खंडणीची वसुली तसेच अवैध सावकारीच्या अनुषंगाने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news