

उल्हासनगर : भर रस्त्यावर सख्ख्या भावांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी तडीपार कुख्यात गुंड सागर पाटील याला हिललाइन पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या तीन जणांना 28 तारखेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पाच दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा मृत्यू झाला असून अर्जुन सुरजबली चौहान गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात शेखर बिराजदार, अजीज शेख आणि अजय राव या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी चौहान कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली होती. माझ्या दोन मुलांची हत्या झाली आहे, हत्या करवणारा सागर पाटील हा गुंड मोकाट असून पोलीस त्याला सोडून देण्यासाठी 25 लाखाची मागणी करत असल्याचा घणाघाती आरोप अमन चौहानच्या आई आणि बहिणीने केला होता.
सागर पाटील यांची पत्नी राणी, त्याची वहिनी अनिता, पुतणी जानवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उलट चव्हाण कुटुंबीयांच्या गरिबीचा गैरफायदा दीपक ठाकूर हा घेत असून कैलास कॉलनी फायरिंग प्रकरणाची कोणताही संबंध नसताना सागर पाटील याला षडयंत्र करून फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या प्रकरणात सागर पाटील याला हिललाइन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 28 तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.