

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील लालचक्की रस्त्यावर रिक्षा रांगेजवळ गोळीबार करून हरेश गजवानी ऊर्फ शहाणी यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अविनाश नायडू याने हरेश गजवानी यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. डोक्यात दोन गोळ्या लागल्याने हरेश यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रावर गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या पथकानेही तात्काळ घटनास्थळी दाखल होत समांतर तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, या हत्येला चार वर्षांपूर्वीच्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे. चार वर्षांपूर्वी संशयित आरोपी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणात हरेश गजवानी हा आरोपी होता. त्यामुळे हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडला आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि आरोपीचा शोध याबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येईल.