उल्हासनगर : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल मोठ्या आवाजात वाजविण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुप्ता आणि अन्सारी कुटुंबीयांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्रस्त असलेल्या ठाणे वाहतूक पोलीस कर्मचारी अन्सारी यांना धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महेश शर्माला खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
20 सप्टेंबर रोजी रात्री सुभाष नगर मधील पेट ऑक्सफर्ड स्कूल परिसरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना वाद झाला होता. संध्या गुप्ता यांच्या गणपतीच्या मिरवणुकीत ढोल वाजविण्यावरून गुलाम अन्सारी यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास गुलाम अन्सारी, त्याचा भाऊ सद्दाम अन्सारी आणि अन्य व्यक्तींनी आपल्याला व मुलाला धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे सायरा गुलामरब्बानी अन्सारी यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या चार महिन्यांच्या बाळासह दोन लहान मुलांना ढोलाच्या मोठ्या आवाजामुळे त्रास होत असल्याने त्यांनी ढोल थोडा पुढे जाऊन वाजविण्याची विनंती केली होती. त्यानंतर धीरज गुप्ता, पंकज गुप्ता, धनराज गुप्ता, नारायण यादव व अन्य व्यक्तींनी त्यांच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
असे असतानाच गुप्ता यांच्या बाजूने विषय संपवण्यासाठी मोहन शर्मा याने पोलीस कर्मचारी असलेले गुलाम अन्सारी यांच्याकडे 60 हजार रुपयाची मागणी केली. त्यांनी याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला दिली. त्यापैकी पाच हजार रुपये देताना ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोहन शर्मा याला रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे धर्माच्या नावावर ब्लॅकमेलिंग करून काही संस्था हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप गुलाम अन्सारी यांच्या पत्नीने केला आहे