Ulhasnagar Crime : बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नाशिकमधून कारचालकाला अटक; दोन जण जेरबंद, चार आरोपी फरार

Ulhasnagar Crime : बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नाशिकमधून कारचालकाला अटक; दोन जण जेरबंद, चार आरोपी फरार
Published on
Updated on

उल्हासनगर : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी उल्हासनगरातील गोल मैदानातून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलेल्या कल्याणमधील बांधकाम व्यावसायिक जयराम निहलानी यांच्या अपहरणप्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. निशांत चंद्रमोरे असे आरोपीचे नाव असून, त्याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले. बुधवारी त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, निशांत हा अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचा चालक होता. आरोपींनी सुरुवातीला निहलानी यांचे अपहरण करण्यासाठी स्कॉर्पिओचा वापर केला. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केल्यामुळे पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी स्कॉर्पिओ सोडून वॅगनआरमधून निहलानी यांना घेऊन जाण्यात आले. या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी कल्याणच्या चक्कीनाका परिसरातील रहिवासी अनिल जगताप याला निहलानी यांची सुखरूप सुटका केल्यानंतर अटक केली होती. दरम्यान, अन्य चार आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सोमवारी सकाळी सुमारे १०:४५ वाजता निहलानी हे नियमित फेरफटक्यासाठी (मॉर्निंग वॉक) उल्हासनगरच्या गोल मैदानात गेले होते. तेथून घरी परतण्यासाठी ते मैदानाबाहेर आले असता, सहा जणांनी त्यांचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी बनावट दाढी लावली होती तसेच तोंडाला रुमाल बांधले होते. निहलानी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या डोक्यात वार करून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये कोंबले आणि तेथून पळ काढला.

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल. आरोपींनी निहलानी यांच्या हालचालींची आधी रेकी केली होती का आणि इतर फरार आरोपींची या गुन्ह्यात नेमकी काय भूमिका होती, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news