

उल्हासनगर : डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रभावाचा फायदा घेत फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उल्हासनगर परिसरात उघडकीस आला आहे, जिथे एका काजू व्यापाऱ्याला ऑनलाईन पेमेंटचा बनावट 'स्क्रीनशॉट' दाखवून तब्बल २३ लाख ९९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील रहिवासी आणि काजू व्यापारी रमेश रामचंद्र वाडकर यांच्यासोबत ही फसवणूक झाली. वाडकर यांना भिवंडीतील पंकज भद्रा नावाच्या एका व्यक्तीने मोठ्या प्रमाणात काजूची ऑर्डर दिली होती. या व्यवहारासाठी व्यापाऱ्याने ३,१४० किलो काजूचा माल ट्रकद्वारे पाठवला. यामध्ये ३०० डबे काजू तुकडा आणि १४ डबे अख्खा काजू अशा मालाचा समावेश होता.
ठरल्यानुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी पाडा येथील एका गोदामात हा माल उतरवण्यात आला. मालाची किंमत २३ लाख ९९ हजार रुपये इतकी होती. माल ताब्यात घेतल्यानंतर आरोपी पंकज भद्रा याने वाडकर यांना विश्वासात घेण्यासाठी पैसे पाठवल्याचे भासवले. त्याने वाडकर यांच्या व्हॉट्सॲपवर कोटक महिंद्रा बँकेचा एक ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट पाठवला. या स्क्रीनशॉटमध्ये वाडकर यांच्या पत्नीच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे आणि अधिकृत वाटणारा यूटीआर (UTR) नंबरही दिसत होता.
मात्र, बराच वेळ झाला तरी बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा झाले नसल्याचा मेसेज न आल्याने वाडकर यांना संशय आला. त्यांनी तातडीने बँकेत चौकशी केली असता, असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे आणि तो स्क्रीनशॉट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश वाडकर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पंकज भद्रा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा प्रकारच्या बनावट स्क्रीनशॉटच्या जाळ्यात इतर व्यापाऱ्यांनी अडकू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.