

उल्हासनगर : बांधकाम व्यावसायिक जयराम निहलानी यांचे सोमवारी सकाळी उल्हासनगरातील गोल मैदानातून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अपहरणानंतर ठाणे पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू करून सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडवली रेल्वे स्थानकाजवळ निहलानी यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात अनिल जगताप याला पोलिसांनी अटक केली असून तो कल्याणचा राहणार आहे. तर अन्य आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, निहलानी यांचे अपहरण ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आले होते. अपहरणानंतर आरोपींनी निहलानी यांच्या मुलाला फोन करून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. सोमवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता निहलानी नेहमीप्रमाणे उल्हासनगरातील गोल मैदान येथे मॉर्निंग वॉकसाठी आले होते. वॉक करून ते घरी जाण्यासाठी मैदानाच्या गेटबाहेर आले असता, चार आरोपी त्यांची वाट पाहत उभे होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी चेहऱ्यावर रुमालही बांधले होते. आरोपींनी निहलानी यांना जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी विरोध केला असता एका आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून आरोपी पसार झाले.
घटना रहिवासी भागात आणि दिवसाढवळ्या घडल्याने काही नागरिकांनी हा प्रकार पाहून तातडीने उल्हासनगर पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी आठ पथके तयार केली. यात गुन्हे शाखेच्या पथकाचाही समावेश होता.
दरम्यान, पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी केली. त्यामुळे आरोपींनी स्कॉर्पिओ सोडून एका अज्ञात ठिकाणी वाहन बदलले आणि निहलानी यांना वॅगनआरमध्ये बसवून पुढे नेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपींनी केलेल्या फोन कॉलच्या आधारे तपास सुरू ठेवला.
या दरम्यान पडघा-टिटवाळा मार्गावरील एका गावात निहलानी यांना ओळखणाऱ्या व्यक्तीने वॅगनआरमध्ये त्यांना जबरदस्तीने बसवून नेले जात असल्याचे पाहिले. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पडघा-टिटवाळा मार्गावरील पोलिसाने गावांचे नेटवर्क सक्रिय केले. निहलानी यांचा फोटो आणि वाहनाची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. संशयित वॅगनआर दिसताच ग्रामस्थांनी तिचा पाठलाग करून पोलिसांना माहिती देण्यास सुरुवात केली. पोलिसांचा वेढा घट्ट होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडवली रेल्वे स्थानकाजवळ निहलानी यांना सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे पथक वेळेत तेथे पोहोचले आणि निहलानी यांची सुखरूप सुटका केली.
यावेळी अनिल जगताप याला पकडण्यात पोलिसांना यश आले, तर अन्य आरोपी फरार झाले. पोलिसांचा अनुसार निहलानी यांचे अपहरण ५० लाख रुपयांच्या खंडणीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.