

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेने एका मोटरसायकल चोराला सापळा रचून अटक करत, त्याच्याकडून तसेच त्याच्या विधी संघर्षित अल्पवयीन साथीदाराकडून तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. अंबरनाथ पूर्व येथील लोकनगरी मैदान परिसरात एक मोटार सायकल चोर येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार शेखर भावेकर यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण खोचरे, पोलिस अंमलदार शेखर भावेकर, सुरेश जाधव, राजेंद्र थोरवे, रामदास उगले, प्रसाद तोंडलीकर यांच्या पथकाने सापळा रचत अक्षय उर्फ कातोडी रामा मारवाडी याला ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याने आपल्या एका अल्पवयीन साथीदारासह हिललाईन पोलीस ठाणे हद्दीतून तीन अॅक्टिवा गाड्या चोरल्या आहेत. पोलिस पथकाने त्या गाड्या जप्त केल्या असून या 3 अॅक्टिवा मोटार सायकलची किंमत 50 हजारच्या आसपास आहे. अक्षय मारवाडी याची वैद्यकीय तपासणी करून त्याला हिललाईन पोलीस ठाणे येथे सुपूर्द करण्यात आले आहे.