Ulhasnagar Crime : उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई, भायखळ्यातील घरफोडी प्रकरणातील १० लाखांहून अधिकचे सोन्याचे दागिने जप्त

Ulhasnagar Crime : उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई, भायखळ्यातील घरफोडी प्रकरणातील १० लाखांहून अधिकचे सोन्याचे दागिने जप्त
Published on
Updated on

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे भायखळा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या साथीदाराकडून १० लाख ९० हजार २६१ रुपये किंमतीचे ८६ ग्रॅम ३२० मिली वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उल्हासनगर कॅम्प १ येथील अमरडाय कंपनीजवळ, उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर घरफोडी करणारा एक संशयित व्यक्ती येणार आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ पंचासमक्ष त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयित नूर नबीर गुलाब कादर शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने भायखळा (मुंबई) येथील एका इमारतीमधील घरात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरी केलेले सोन्याचे दागिने त्याचा मित्र अंजुम मुजाअली शेख याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे त्याने सांगितले.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ भायखळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून खात्री केली असता त्यांनी गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून पसार असलेला आरोपीचा मित्र अंजुम मुजाअली शेख याचा शोध घेतला आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल, कागदपत्रे आणि आरोपी नूर नबीर गुलाब कादर शेख यास योग्य त्या लेखी रिपोर्टसह पुढील कायदेशीर कारवाईसाठी भायखळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news