

उल्हासनगर : भिवंडी मध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय बतावणीखोर अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात उल्हासनगर गुन्हेबशाखेला यश आले आहे. या आरोपीने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले तब्बल 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
24 सप्टेंबर 2025 रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलण्यात गुंतवून सोनाराच्या दुकानात चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक पवार याना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सीसीटीव्ही फूटेज मध्ये दिसणारा व्यक्ती हा सिकंदर मुमताज जाफरी असून तो भिवंडी येथील बंद सलाउद्दीन शाळा जवळील इराणी मशिद परिसरात फिरत आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय काजारी, अशोक पवार, पोलिस अंमलदार मंगेश जाधव, अमर कदम, रितेश वंजारी, संजय शेरमाळे, बाबू जाधव, रामदास उगले, नितीन बैसाणे, मनोरमा सावळे यांच्या पथकाने इराणी मशीद परिसरात सापळा रचून जाफरीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने विविध ठिकाणी हातचलाखी आणि बतावणी करून चोरी केल्याचे उघड झाले. या आरोपीकडून सुमारे साडे सहा लाख रुपये किंमतीचे 65 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच एक लाख लाख किंमतीची सुझुकी कंपनीची स्कुटी असा एकूण साडे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीवर ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, विठ्ठलवाडी आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यात चोरी, फसवणूक आणि हातचलाखीचे गुन्हे समाविष्ट असून काही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), २०४, २०५ आणि ३(५) अंतर्गत कारवाई सुरू आहे. सध्या आरोपीच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.