

उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प तीन येथील ओटी एरिया परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलमध्ये उतरलेल्या करंटमुळे विजेचा धक्का लागून २६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सीसीटीव्ही पोलच्या विद्युत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गंगा अपार्टमेंटमध्ये राहणारी करिश्मा मडवानी ही तरुणी परिसरात असताना सुरक्षा व्यवस्थेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलच्या संपर्कात आली. यावेळी तिला जोरदार विजेचा धक्का बसला.
या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत करिश्माच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्हीच्या पोलमध्ये वीजप्रवाह नेमका कसा आला, तसेच या दुर्घटनेमागे कोणती कारणे आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही पोलची विद्युत सुरक्षा योग्य पद्धतीने करण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.