

उल्हासनगर : उल्हासनगरातील बिर्ला गेट परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात ५१ वर्षीय देवेंद्रसिंह राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा संजय राजपूत गंभीर जखमी झाला. जखमी संजयवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्रसिंह राजपूत हे दररोज आपल्या मुलाला अॅक्टिव्हावरून शहाड रेल्वे स्थानकावर सोडत असत. त्यानंतर ते उल्हासनगरातील एका स्टील दुकानात कामासाठी जात असत. मुलाला वाहन चालवता येत नसल्यामुळे ही त्यांची रोजची दिनचर्या होती. सोमवारी सकाळी शहाडकडे जात असताना सेंच्युरी कंपनीसमोरील कमल हॉटेलजवळ त्यांच्या अॅक्टिव्हाला भरधाव कारची धडक बसली. या भीषण धडकेत देवेंद्रसिंह राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी संजयचा जबाब मध्यवर्ती रुग्णालयात नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर माळी करीत आहेत. विशेष म्हणजे जखमी असलेल्या देवेंद्र सिंह आणि त्यांच्या मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता अविनाश मुथा याने पळ काढला. त्यानंतर अविनाश याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात स्वतःला हजर केले.
महात्मा फुले पोलिसांनी कारचालक अविनाश प्रकाश मुथा याला ताब्यात घेत उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.