ठाणे : जन्मदाखला देण्याकरिता 400 रुपयांची लाच स्वीकारणार्या ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीमधील रणजित पांडूरंग मगदूम (42) आणि निखील मोतीराम कडव (24) या दोन्ही लिपिकांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) रोजी करण्यात आली असून याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे एसीबीने दिली.
तक्रारदारांनी त्यांची नात हिचा जन्मदाखला मिळावा, याकरीता त्यांनी दिवा प्रभाग समितीत अर्ज केला होता. त्यानुसार लिपिक रणजित मगदूम यांनी दाखला देण्यासाठी तक्रारदारांकडे 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे एसीबी कार्यालयात लेखी तक्रार केली. त्याच्या अनुषंगाने 28 ऑगस्ट 2024 रोजी पडताळणी कारवाईमध्ये लिपिक रणजित मगदूम यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 400 रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच ती रक्कम त्यांनी लिपिक निखील कडव यांच्यासाठी स्वीकारल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रगती अडसुरे करत आहेत.